बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात मोठा पुतळा होणार या शहरात

0
347

औरंगाबाद, दि. १३ (पीसीबी) : महापालिकेने क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा देशातील सर्वात मोठा असल्याचे मानले जाते. त्यासोबतच आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात मोठा पुतळा रंगाबादेतच होत आहे. हा पुतळा ५४ फुटांचा असून, चबुतऱ्यासह स्मारकाची उंची ८४ फुटांपेक्षा अधिक राहणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादवर विशेष प्रेम होते. त्यामुळे सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात स्मारकासाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. हा निधी अपुरा पडत असल्यामुळे पुन्हा नऊ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यानुसार नव्याने निविदा अंतिम करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामाची पाहणी केली तर तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी वारंवार आढावा घेतला. काही दिवसांपूर्वी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी देखील या कामाची पाहणी करून कामाची गती वाढवण्याचे कंत्राटदाराला आदेश दिले.

सध्या याठिकाणी चबुतऱ्याचे काम सुरु आहे, रस्त्यांचे काम काही प्रमाणात झाले आहे. महापालिकेकडून वृक्ष लागवड केली जात आहे. आत्तापर्यंत सिव्हीलचे ९० टक्के काम झाल्याचा दावा कंत्राटदारातर्फे केला जात आहे. राज्यातला सर्वात मोठा ५४ फुटांचा बाळासाहेबांचा पुतळा या ठिकाणी होणार आहे. पुतळ्याखाली आठ मीटरचा चबुतरा असेल.

पुतळ्याच्या खालीच संग्रहालय असेल. या संग्रहालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडिओ, व्यंगचित्रे असतील. डिसेंबरपर्यंत काम संपविण्याची कंत्राटदाराला मुदत आहे. पण मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान हा पुतळा कोण करणार? हे निश्चीत झालेले नाही. मुंबईतील शिल्पकार शशिकांत वडके यांच्यासोबत याबाबत चर्चा सुरु आहे. मुंबईतील फोर्ट परिसरातील बाळासाहेबांचा पुतळा वडके यांनीच साकारला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या स्मारकासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, महापालिका आयुक्त समितीत आहेत. दरम्यान गुरुवारी (ता. १३) पालकमंत्री संदीपान भुमरे स्मारकाचा आढावा स्मार्ट सिटीच्या कार्यालयात घेणार आहेत, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.