बालेवाडीतील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

0
472

पुणे, दि. २५ (पीसीबी) : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये छापेमारी करीत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील अशा ११ तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी रॉकी कदम, राहुल मदन उर्फ मदन संन्यासी, दिनेश उर्फ मामा, नवीन आणि रोशन नावाच्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाइन पद्धतीने आणि व्हाट्सअप क्रमांकावरून हे वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवले जात होते. काही दिवसांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने विमान नगर येथे कारवाई करीत मुंबईच्या एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय प्रकरणी ताब्यात घेतले होते. त्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला राहुल मदन उर्फ मदन संन्यासी हाच चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बालेवाडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल टॅग हाऊस या ठिकाणी छापा टाकला. या हॉटेलमधील रूम नंबर ३०३, ३०४ आणि ३०२ तसेच पॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंट मधून तब्बल ११ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
यामध्ये परराज्यातील आठ तरुणींचा आणि मुंबईतील तीन तरुणींचा समावेश आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा चतु:शृंगी पोलिसांकडे देण्यात आला आहे.