बालाजीनगर परिसरातील डांबरीकरणास सुरुवात माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमाताई सावळे यांच्या पुढाकारातून नागरिकांना दिलासा

0
4

दि.१३(पीसीबी)- प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरात आज दुपारी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. ड्रेनेजच्या कामांमुळे संपूर्ण रस्ता उखडल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक व दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.या दुरवस्थेवर वेळेत लक्ष देत, माजी नगरसेविका आणि माजी स्थायी समिती अध्यक्षा सौ. सीमाताई सावळे यांच्या पुढाकारातून महापालिकेच्या संबंधित विभागांना रस्ता डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी सज्ज करण्यात आले.

यादरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि ओल्या हवामानामुळे काम सुरू करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे काही काळ प्रलंबित राहिलेलं हे काम आजपासून प्रत्यक्षात सुरू झालं असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.ड्रेनेज योजनेअंतर्गत रस्ते खोदकाम झाल्यानंतर संपूर्ण बालाजीनगर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्ते खराब अवस्थेत गेले होते. चालताना, वाहन चालवताना अनेक नागरिकांना अडचणी येत होत्या. विशेषतः शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक, आणि महिला वर्गाला याचा मोठा त्रास होत होता.या कामासाठी प्रभागातील प्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा करत महापालिकेकडे विनंती केली होती. अखेर आज या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे व सीमाताई सावळे यांचे आभार मानले आहेत.

बालाजीनगर हा प्रभाग क्रमांक ८ चाच महत्त्वाचा भाग असून, या भागातील समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाही माजी नगरसेविका सौ. सीमाताई सावळे यांनी दिली.त्यांनी सांगितले की, “पावसामुळे काम काही दिवस थांबावं लागलं होतं. मात्र नागरिकांनी खूप संयम ठेवला आणि सहकार्य केलं. त्यामुळेच आज हे काम सुरू करता आलं. प्रत्येक नागरिकाच्या अडचणी मी स्वतःच्या अडचणी मानून काम करते. समाजहितासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे.

सीमाताई सावळे यांचा विकासकामांमध्ये अनुभव आणि प्रशासनातील दखलपात्र संवाद कौशल्य यामुळे अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली आहे. बालाजीनगरसारख्या क्षेत्रांमध्ये विकासकामांची गरज ओळखून त्या तत्परतेने काम करत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

या काळात रस्त्याची दुरवस्था असूनही नागरिकांनी दाखवलेला संयम, शिस्त आणि सहकार्य हे खरोखरच प्रशंसनीय आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन आणि जनतेमधील हा विश्वासाचं नातं टिकून राहणं, हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची ताकद आहे.सध्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून, पुढील टप्प्यात परिसरातील अंतर्गत गल्ल्या व लहान रस्त्यांचेही डांबरीकरण व दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक निधी व मनपाचे मंजुरीचे टप्पे पूर्ण झाले आहेत.सीमाताई सावळे यांचा सामाजिक भान, कार्यकर्तृत्व आणि नागरिकांशी असलेला संवाद हीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खरी ताकद आहे. विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव जोपासत, जनतेच्या मनात विश्वासार्ह स्थान निर्माण केलं आहे.