दि.१६(पीसीबी)-प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरातून वगळण्यात आलेली सुमारे ४,५०० मतदारांची नावे अखेर अंतिम मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयानंतर बालाजीनगरमधील मतदारांनी जल्लोष करत सामाजिक कार्यकर्त्या व नेत्या सिमाताई सावळे यांचा जाहीर सत्कार केला.
निवडणूक प्रक्रियेतील ही चूक दुरुस्त व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अनेक कुटुंबांची नावे अचानक मतदार यादीतून गायब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र अंतिम मतदार यादी जाहीर होताच ही नावे पुन्हा समाविष्ट झाल्याचे स्पष्ट झाल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना सिमाताई सावळे म्हणाल्या, “जनतेचं प्रेम विकत घेता येत नाही, ते प्रामाणिक कामातूनच मिळवावं लागतं.” निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच आणि मतदार यादीतील अन्याय दूर झाल्याने बालाजीनगरमधील माता-भगिनी मोठ्या संख्येने एकत्र आल्या आणि त्यांनी आपुलकीने मला सन्मानित केले, असेही त्या म्हणाल्या.
“तुमचं हे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद पाहून मन भरून आलं आहे. आज इथेच माझा विजय निश्चित झाल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. हा विश्वास कायम माझ्या पाठीशी राहू द्या. तुमच्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत राहणं, हीच माझी खरी ताकद आहे,” असे भावनिक शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले.या घटनेमुळे प्रभाग क्रमांक ८ मधील राजकीय वातावरणात उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.











































