गोळेवाडी, दि. १४ जुलै (पीसीबी) -अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. त्यानंतर मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना 19 डिसेंबर 2022 ते 11 जुलै 2023 या कालावधीत मावळ तालुक्यातील गोळेवाडी, आंबी चौक येथे घडली.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 22 वर्षीय पतीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असताना आरोपींनी तिचा विवाह लावून दिला. विवाह नंतर ती पाच महिन्यांची गरोदर राहिली. दरम्यान ती वैद्यकीय तपासणीसाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सुरुवातीला भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हा गुन्हा पुढील तपासासाठी तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.