पिंपरी, दि. 29- “मुलं लहान असतानाच त्यांच्यावर संस्कार करणे आवश्यक असते. आपली संस्कृती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, क्रांतिकारक, दैवत व गुरूजणांचा सन्मान करणे, सचोटीने वागणे, निसर्गाचे संवर्धन करणे, सर्वांविषयी बंधुभाव ठेवणे, मातृभुमीची सेवा करणे, देशाचे कायदे व नियम पाळणे या सारखे संस्कार बालपणी रुजले तर ही मुले जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होतील याची खात्री आहे. पारंपरिक खेळ, गाणी, गोष्टी यामधून मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात.” असे प्रतिपादन जेष्ठ योगशिक्षक डॉ. अजीत जगताप यांनी केले.
गणेश सिध्दी सोसायटी, नेवाळे वस्ती येथे विश्व हिंदू परिषद, मातृशक्तीने आयोजित केले बालसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विजय देशपांडे, सरिता नेवाळे, भास्कर रिकामे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे ते म्हणाले “आजकाल विभक्त कुटुंब, त्यातही एकच अपत्य, आईबाबा दोघेही नोकरी व्यवसायासाठी व्यस्त असल्यामुळे मुलांवर शालेय शिक्षणाबरोबरच नैतिक मुल्ये शिक्षणासाठी अशा शिबिराची आवश्यकता आहे.”
दि. २५ ते २८ मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या शिबीराचे आयोजन शारदा रिकामे यांनी केले. सुरेखा बल्लाळ, शर्वरी यरगट्टीकर, अनिता पडवळ यांनी शिबीर कालावधीत मुलांना चित्रकला, कलात्मक वस्तु बनवणे त्याबरोबरच खेळ, गाणी, कथांच्या माध्यमातून संस्काराचे धडे दिले.
सुविचार, प्रार्थना, श्लोक इ. पाठांतर करुन घेतले.
विनामूल्य असलेल्या चार दिवशीय शिबिरात ५ ते १२ या वयोगटातील ४५ मुलमुली सहभागी झाली होती. या मुलांच्या पालकांनीही उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला. शिबीर यशस्वी होण्यासाठी स्थानिक गणेश सिध्दी सोसायटीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.