बारा वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, महिला सुरक्षा वाऱ्यावर..

0
4

दि . 6 ( पीसीबी ) – पुण्यातील स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अत्याचाराच्या घटनेने मुंबई हादरली असून मुंबईत देखील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या काकांसोबत राहत होती.24 फेब्रुवारी ही मुलगी बेपत्ता झाली होती,त्यानंतर मुलीच्या काकांनी पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तात्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला. पीडित मुलीच्या जवाबानंतर आरोपी विरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . तसेच याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. जमाल,आफताब,महफुझ,हसन,जाफर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलगीला शाळा सुटल्यानंतर एकटी असल्याचे बघून आरोपीनीं तिला जोगेश्वरीतील संजयनगर भागातील घरी नेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. सध्या जोगेश्वरी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.