बारामती हीच आपली कुटुंबीय ओळख.. सुनेत्रा पवार भावुक!

0
2

दि.०६ (पीसीबी)- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अत्यंत भावनिक भाषण केले. दिवंगत नेत्यांच्या आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला. बारामती हीच आपली कुटुंबीय ओळख असल्याचे सांगत त्यांनी विकासाचा मार्ग पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, अवघ्या दोन महिन्यांपूर्वी बारामतीसह राज्याने आपल्या लाडक्या नेत्याला गमावले आहे. त्या घटनेनंतर इतक्या लवकर पोटनिवडणूक होईल, असा विचारही आपण कधी केला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. अजूनही दादा आपल्यात नाहीत हे मान्य करणे कठीण वाटते, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचेच नव्हे तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाचेही मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, दादांसाठी बारामती ही आईसारखी होती. येथे राहणारा प्रत्येक नागरिक त्यांच्यासाठी पांडुरंगासारखा होता. बारामतीकरांची सेवा करणे म्हणजेच पांडुरंगाची सेवा, असा त्यांचा ठाम विश्वास होता. बारामती म्हणजेच दादांचा श्वास होता आणि म्हणूनच त्यांचा शेवटचा श्वासही याच मातीत विलीन झाला, असे सांगताना सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले आणि सभागृहातील वातावरण भावनिक झाले.


बारामतीतील प्रत्येक झाड, रस्ता, शाळा, नदी आणि इमारतीत दादांच्या कार्याची छाप दिसून येते, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. आजही निसर्गातील प्रत्येक घटक त्यांच्या आठवणींनी भारावलेला आहे, असे त्या म्हणाल्या. बारामतीकरांच्या विकासासाठी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपण वैयक्तिक दु:ख मनात दडवून पुढे आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानत सांगितले की, गेल्या सुमारे 35 ते 36 वर्षांत अजितदादा यांना बारामतीकरांनी प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिले. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी स्वतःचे विक्रम मोडले. दादा नेहमी म्हणायचे की, मिळालेल्या मतांचा मान राखण्यासाठी मी चोवीस तास काम करतो. त्यांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिली निवडणूक असल्याने ती केवळ राजकीय प्रक्रिया नसून दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी आहे, असेही त्यांनी नमूद केले.