बारामती लोकसभेसाठी महादेव जानकर यांचे पाचर, भाजपाच्या स्वप्नांचे काय होणार ?

0
378

पुणे,दि.१५(पीसीबी) – देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची किंमत आगामी काळात भाजपला मोजावी लागणार असे दिसते. बारामती हा महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ ज्यात काहीही करुन भाजपला कमळ फुलवायचंय. २०१४ ला रासप नेते महादेव जानकर यांच्या रूपात भाजपने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना तगडी टक्कर दिली होती. ज्या मतदारसंघात सुप्रिया सुळे लाख ३ लाख मतांनी विजय मिळायच्या त्याच मतदारसंघात केवळ ६९ हजार मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या. गोपीनाथ मुंडेंचं नियोजन आणि जानकरांसारखा पवारांना थेट भिडणारा उमेदवार यामुळे २०१४ ला बारामतीत हादरे बसले. २०१९ लाही कांचन कुल यांच्या रुपाने भाजपने अशीच टक्कर देण्याचा प्रयत्न केला, आता तर २०२४ ची तयारीही सुरु झालीय. पण, आता महादेव जानकरांनी स्वतंत्र लढण्याच्या घोषणेने भाजपची अडचण झाली आहे. भाजपच्या मिशन बारामतीला जानकर यांच्या नव्या घोषणेने ब्रेक लागू शकतो का ? भाजपसाठी महत्त्वाचे असलेले जानकर भाजपाला धक्का देणार का? भाजपच्या मिशन बारामतीच्या स्वप्नांला सुरुंग लागेल का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये समोर येईल. जानकर यांनी वेळ साधून अगदी परफेक्ट पाचर ठोकल्याने भाजपाची गोची झाली आहे.

गेली तीन वर्ष बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करते आहे. पवारांचा गड काबीज करण्याचा भाजपनं चंग बांधला आहे. २०१४ ला आलेली मोदींची मोठी लाट आणि काही स्थानिक समीकरणे जुळून आल्याने महादेव जानकर यांना बारामतीतून प्रचंड मोठ मताधिक्य मिळालं. शेवटी ही निवडणूक जानकर हरले पण भाजपने राष्ट्रवादीला भविष्यात बारामतीची अमेठी व्हायला वेळ लागणार नाही हे स्पष्ट संकेत दिले.. भाजपने या मतदारसंघात खडकवासल्यापासून ते दौंडपर्यंत ताकद लावलीय, पण महादेव जानकरांच्या एका घोषणेने सगळं चित्र बदललंय.

दौंड इंदापूर आणि बारामती विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर धनगर समाज आहे. २०१४ ला सुप्रिया सुळेंना टक्कर देताना याच समाजाने जानकरांना भरभरून मतं दिली. महादेव जानकर यांच्या पाठीशी भाजपने मोठी ताकद उभी केली होती. २०१४ ला सुप्रिया सुळेंना एकूण ५ लाख २१ हजार ५६२ मते मिळालेली. तर, महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती. त्यावेळी केवळ ६९ हजार ६६६ मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या.

महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना तगडी फाईट दिली होती. २०१४ ला गोपीनाथ मुंडे यांनी माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी या मतांचं जे समीकरण जुळवलं त्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकले. पवार कुटुंबाला थेट अंगावर घेणाऱ्या महादेव जानकरांनी साडे चार लाख मतं मिळवून बालेकिल्ल्यात पवारांना पहिला हादरा दिला, असंही म्हणतात. जानकर कमळाच्या चिन्हावर बारामतीतून लढले असते, तर ते जिंकले असते, असं बोललं जातं.

महादेव जानकर यांनी २०१४ ला कमळावर निवडणूक न लढवता रासपच्या चिन्हावर लढणं पसंत केलं होतं. पण, आता जर भाजप सोबत न जाता जानकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढायचं ठरवलं तर सुप्रिया सुळेंना मिळणाऱ्या धनगर समाजाच्या मतांवर परिणाम होईल. मात्र, भाजपच्या मिशन बारामतीवर देखील परिणाम होऊ शकतो. भाजप उमेदवाराला मिळणाऱ्या धनगर समाजाच्या मतदारांवर परिणाम होऊ शकतो.

दुसरीकडे भाजपने बारामतीचा किल्ला सर करण्यासाठी जोरदार रणनीती आखली आहे. आत्तापासूनच भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामतीचे प्लॅनिंग सुरू केलं आहे. दौंडचे आमदार राहुल कुल, इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांचंही मोठं स्थान आहे. पुरंदरचा विचार करायचा झालं तर विजय शिवतारे सध्या शिंदे गटात आहेत आणि राज्यात शिंदे आणि फडणवीस यांची युती असल्याने शिवतारेंना भाजप उमेदवाराचे काम करावे लागेल. म्हणजे पाचही मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना तगडी फाईट मिळणार आहे. महादेव जानकर यांचं स्वतंत्रपणे लढणं सुप्रिया सुळे यांच्यासह भाजपचं टेन्शन वाढवणारं ठरण्याची शक्यता आहे. महादेव जानकर यांनी एसटी संपाच्या काळात देखील स्वतंत्र भूमिका मांडली होती. आता, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दौंडची जागा भाजपनं रासपसाठी सोडली मात्र, ऐनवेळी भाजपचा एबी फॉर्म राहुल कुल यांना दिला होता. त्यामुळं महादेव जानकर जुना हिशोब चुकता करतील का हे येणाऱ्या काळात कळेल.