बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक; सहीसाठी पावणेदोन लाखांची मागितली होती लाच!

0
6

बारामती ,दि. 22 पीसीबी – बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला फाईलवर सही करण्यासाठी पावणे दोन लाख रुपयाची मागणी करणाऱ्या बारामती नगर परिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बुधवारी (दि.19) सायंकाळी रंगेहात पकडलं. या अधिकाऱ्यावर एका जिममध्ये एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केलीय.

पावणे दोन लाखांची लाच मागितली होती : विकास ढेकळे असं या नगररचना अधिकाऱ्याचं नाव आहे. बारामतीतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची एक फाईल बारामती नगरपरिषदेच्या नगररचना विभागात प्रलंबित होती. या फाईलवर सही करण्यासाठी नगररचना विभागाचा अधिकारी विकास ढेकळे यानं पावणे दोन लाख रुपयाची लाच मागितली होती. या अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासामुळं संबंधित बांधकाम व्यावसायिकानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याच्यावर कारवाई केलीय.

प्रशासनात एकच खळबळ : विकास ढेकळे याने तडजोडी अंती एक लाख रुपये घेऊन फाईलवर सही करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी विकास ढेकळेला रंगेहात पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार, यंत्रांना कार्यान्वित झाली आणि विकास ढेकळेला बारामती शहरातील एका जिममध्ये एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं. यामुळं बारामती नगरपरिषदेसह प्रशासनात एकच खळबळ उडालीय. तसंच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विकास ढेकळे याच्यावर बुधवारी रात्री उशिरा बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.