बारामतीत भाजपच्या विचाराचा खासदार होणार – गोपीचंद पडळकर

0
175

बारामती, दि. १७ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत दाखल होताच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा बारामतीबाबत कॉन्फिडन्स वाढल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये अजित पवारांविरोधात सपाटून पराभूत झाल्यानंतर पडळकर बारामतीकरांना दुर्मिळ झाले होते. यातच पवार सत्तेत गेल्यानंतर पहिल्यांदा आलेल्या पडळकांनी बारामतीत भाजपच्या विचाराचा खासदार होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर मंगळवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच अजितदादा भाजपसोबत का आले, याचेही कारण सांगितले. ते म्हणाले, बारामतीत भाजप चांगले काम करीत होते. ते पाहूनच अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. पडळकारांच्या या विधानानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. यावर अजित पवार काय बोलणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष आहे.

आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून भाजपच्या विचाराचा खासदार असणार, असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला. ते म्हणाले, आता अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. भाजपचे जास्तीत जास्त खासदार दिल्लीला पाठवायचे आहेत. भाजपला बारामती जिंकायची आहे. त्यानुसार आता बारामतीचा खासदार आमच्या विचाराचा होणार, हे एक लाख टक्के खरे आहे. मात्र तो भाग्यवान कोण असेल ते माहिती नाही, असे पडळकर म्हणाले.

पडळकांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ठाकरेंना विधानसभाध्यक्षांनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर कोर्टात जावे. ठाकरे यांच्यासोबतची 50 आमदार निघून गेले. ते बहुमत चाचणीला थांबलेच नाहीत. याचा अर्थ ठाकरेच सर्वात आधी पळून गेले होते. लोकांनी २०१९ मध्ये भाजपला कौल दिला होता. मात्र त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे काहीही राहिले नाही, असेही ते म्हणाले.