बारामतीत आईच्या प्रचारासाठी आता लेक उतरली प्रचारात

0
133

बारामती, दि. २५ : बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात बारामतीसाठी मतदान होणार आहे. एकीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी पार्थ आणि जय ही दोन्ही लेकरं मैदानात उतरली आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठीही त्यांची कन्या रेवती सुळे प्रचाराला लागली आहे. पवार कुटुंबातील बहुतांश सदस्य सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी असून अजितदादा मात्र एकट्याने प्रचार करताना दिसत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. बारामती मतदारसंघात मागील ५० वर्षांच्या राजकारणात आजवर विविध घडामोडी झाल्याचे सर्वांना ज्ञात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची समीकरणंच बदलली आहेत. बारामतीतून फक्त महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना नसून, पवार विरुद्ध पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळेच या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवारी लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांच्या कुटुंबीयांकडून आपापल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या रेवती सुळे यांनीही प्रचारात सहभाग घेतला असून, योगेंद्र पवार यांच्या समवेत त्यांनी आज बारामती शहरातून पदयात्रा काढली.