बारामतीत अजित दादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

0
56

बारामती,दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या स्वागताचे बॅनर लागले. यात एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. अजित पवार हे बारामतीमधून लढणार की नाही याबद्दल गेल्या काही दिवसांपासून संभ्रम आहे. अजित पवारांनी गेल्या आठवड्यात बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिले होते. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार बारामतीमधूनच लढतील असे नुकतेच पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार नेमके कोणत्या मतदारसंघातून लढणार हे त्यांनी स्वतः अजून स्पष्ट केलेले नाही.
अजित पवार यांनी आज सकाळी 6 वाजता बारामती दौऱ्याला सुरुवात केली. अनेक विकास कामांना त्यांनी भेटी दिल्या. सध्या गणपती उत्सव साजरा केला जातोय.
बारामती शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार पवार मुख्यमंत्री व्हावेत. याआधी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री आशा आशयाचे फ्लेक्स लागले होते.

भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर होते. मुंबई विमानतळावर अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शहांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर बिहार पॅटर्न राबवण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देण्याची मागणी केल्याचे वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वृत्त सपशेल फेटाळले होते. मात्र या निमित्ताने अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा समोर आली होती.