बारामतीचा गड २०२४ मध्ये जिंकणारच – बावनकुळे

0
288

बारामती, दि. ६ (पीसीबी) : पवारांच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आज (ता. ६ सप्टेंबर) श्रीगणेशा केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत येत भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासोबत हा गड जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचे सांगत मिशन बारामतीच्या दृष्टीने रणशिंग फुंकले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्यांवर स्पष्टपणे मते मांडली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहूल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके आदींची उपस्थिती होती. बावनकुळे म्हणाले की, संघटना मजबूत होईल, तेव्हा बारामतीचा राष्ट्रवादीचा गडही उद्‌ध्वस्त होईल. गड कोणा एकाच्या मालकीचा नसतो, वेळेनुसार बदल होत राहतो, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड आम्ही नक्की जिंकू.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची मोट बांधली जात आहे असे विचारता, पवार यांचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपले संघटन वाढविण्याचा अधिकार असतो. राज्यात राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर आठ जागांवर हा पक्ष गेलेला नाही. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु म्हणून ओळखले जातात. विरोधकांकडे फक्त राजकीय व्हिजन आहे. त्यातून त्यांना आपापली दुकाने चालवायची आहेत. मोदी देशासाठी काम करत आहेत. जो राष्ट्रासाठी काम करतो. त्यांच्या मागे जनता उभी राहते.

काटेवाडी गावापासून दौरा सुरु करत असल्याबद्दल विचारले असता बावनकुळे म्हणाले, प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांना ताकद मिळाली पाहिजे, यासाठी काटेवाडीत जात आहे. बारामतीत प्रत्येकाला यावंसं वाटत, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, सुळे काय म्हणाल्या, ते मला माहिती नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्या येत आहेत. खासदार म्हणून सुप्रिया सुळे त्यांना भेटू शकतात.

बारामतीसह राज्यातील सर्व जागांवर आम्ही लढणार आहोत. आमची संघटना वाढवणे, ताकद वाढविणे, उमेदवार निवडून आणणे ही पक्षाची जबाबदारी आहे. बारामतीची जागा जिंकायची, हा आमचा निश्चय आहे. त्यामुळे आम्ही कोणाविरुद्ध लढतोय हा अजेंडा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप बारामतीची जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणेल.