बारामती, दि. ९ – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली पहायला मिळत आहे. लोकसभेला महायुतीचा पाडाव केल्याने महाविकास आघाडी सध्या जोरात आहे. राज्यातील काही हायहोल्टेज लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यातीलच एक महत्त्वाची लढत बारामती विधानसभा मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष बारामतीमध्ये कोण उमेदवार असणार याकडे लागलेलं आहे. आता बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
शरद पवार गटाचा बारामतीचा उमेदवार ठरला
बारामतीत सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार आहेत, त्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अशात या जागेसाठी इच्छुक असलेले अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी ‘स्वाभिमान यात्रे’ची घोषणा केली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात दिनांक 10 सप्टेंबरपासून ही यात्रा काढण्यात येणार आहे. युगेंद्र पवार यांच्या या यात्रेला खुद्द शरद पवार यांचा आशीर्वाद तर खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाचा उमेदवार ठरला असून बारामतीच्या उमेदवारीची माळ युगेंद्र पवार यांच्याच गळ्यात पडणार असल्याचं मानलं जात आहे.
अजित पवारांची बारामतीतून माघार
लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांना मोठा धक्का बसला होता. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. हा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळालं. बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही चूक होती असं अजित पवारांनी बोलूनही दाखवलं. तसेच लोकसभा निवडणुकीचा धसका घेत अजित पवारांनी विधानसभेला बारामतीतून माघार घेतल्याचंही बोललं जात आहे.
अजित पवारांनी बारामतीतून लढणार नसल्याचं जाहीर केलंय. यानंतर बारामतीत अजित पवार नाही तर कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. अशात पुत्र जय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यात अजित पवार लढले नाही तर त्यांचा मुलगा जय पवार किंवा विश्वास नाना देवकाते यांच्या नावांची चर्चा आहे.