बारमतीत ५१ टक्के मते घेऊन नक्की जिंकू

0
252

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘महाविजय- 2024’ अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातून 48 पैकी महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, असा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता.11) पिंपरी-चिंचवडचा दौरा केला.

त्यावेळी त्यांनी बारामतीत 51 टक्के मते घेऊन शंभर टक्के जिंकूअसा मोठा दावा केला. तसेच राज्यात महाविजयाचा संकल्प केला असून, 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असे सांगितले. मावळ, शिरूरसह राज्यातही महायुतीचे उमेदवार कोण असतील, याची आम्हाला चिंता नाही. जेथे महायुतीतील जो पक्ष मजबूत असेल, तेथे त्यांचा उमेदवार असेल, त्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, असे बावनकुळेंनी स्पष्ट केले.

2024 ला पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, तेव्हा तेथे महाराष्ट्रातील आमचे 45 खासदार असतील, असा दावा त्यांनी केला. आतापर्यंत या अभियानात तीस हजार लोकांना भेटलो, त्यातील फक्त चौघांनी विरोधी पक्षांचे नाव घेतले, तर बाकीच्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजेत असे सांगितले, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल, तसा ‘इंडिया’ आघाडीत प्रचंड असंतोष निर्माण होईल आणि त्यांच्या एका दिलाचे हजार तुकडे होतील, अशी भविष्यवाणी बावनकुळेंनी या वेळी केली. लोकप्रतिनिधी हा पक्षाचा गाभा असल्याने चिंचवडच्या महिला आमदार अश्विनी जगताप यांना डावलण्याचा प्रश्नच नाही, तसेच कोणीही त्यांना डावलू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांना नुकतेच पक्षाच्या पत्रकार परिषदेत डावलल्याचा कुणीतरी तेथे विपर्यास केला आहे, असे ते म्हणाले.