पुणे, दि. ११ (पीसीबी) -पत्नीसाठी नवीन घर घेता यावं म्हणून पतीने ३७ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरातून समोर आलीय. याप्रकणी दागिने चोरणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लाप्पा होसमानी (वय,३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बबीता डिसूजा यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस असल्याने डिसूजा कुटुंबीय रात्री बाहेर गेले असताना त्याच्या घरातील सोने, चांदीच्या दागिन्यांबरोबर डायमंड, नेकलेस आणि महागडी घड्याळ चोरून नेल्याची तक्रार त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
त्यानंतर स्थानिक पोलिसांबरोबरच युनिट ५ कडे या घटनेचा तपास दिल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयित व्यक्ती घराच्या भागात वावरत असताना आढळून आला. या व्यक्तीच्या गाडी नंबरवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान मलाप्पाने हे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच प्रेम विवाह केल्यामुळे घरच्यांनी घरातून हाकलून दिले होते. मात्र पत्नीसाठी नवीन घर घेता यावं आणि तिथे एकत्र राहता यावं यासाठी त्याने यासाठी घरफोडी केल्याची कबुली दिली.
दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने असा ३७लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.