दि . १४ ( पीसीबी ) – वैद्यकीय क्षेत्र हे अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. इथे पेशंटच्या जीवाशी खेळ चालू असतो. दुर्दैवाने वैद्यक शास्त्रात दर वेळी दोन अधिक दोन चार होतीलच असे नाही. सर्व उपलब्ध प्रयत्न करून सुद्धा रुग्ण दगावतात. त्यामुळे एखाद्या रुग्णाचे उपचार करताना अक्षम्य दुर्लक्ष वा हलगर्जीपणा झाल्याशिवाय कोर्ट डॉक्टरांविरुद्ध निकाल देत नाही. गर्भारपणात दीनानाथ मध्ये नोंदणी न केलेला अतिशय हाय रिस्क पेशंट दीनानाथ मध्ये बाह्य रुग्ण विभागात एकदा दाखवून दुसऱ्या एका मोठया खाजगी रुग्णालयात दाखल होते. दुसऱ्या दिवशी त्या खाजगी रुग्णालयात तिचे सीझर होते. ऑपरेशन दरम्यान गुंतागुंत निर्माण होते. ही गुंतागुंत इतकी खराब असते की या खाजगी रुग्णालयातील निष्णात तज्ञांनी प्रयत्न करून सुद्धा हा पेशंट दगावतो. दीनानाथच्या डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचारात करताना कुठलीही चूक नसताना दीनानाथवर इतकी चिखलफेक का होते आहे? असा प्रश्न आज संपूर्ण डॉक्टर प्रजातीला पडला आहे.
आज दीनानाथ हे रसाळ आणि गोड आंबे लागलेले मोठे झाड झाले आहे. उठ सूट कोणीही सोम्य गोम्या या झाडाला दगड मारताना दिसतो आहे. हे झाड इतके मोठे कसे झाले आणि त्याला इतके गोड आंबे इतक्या भरघोस प्रमाणात का लागले याचा कुणी विचार करायला तयार नाही.
कारण आणि परिणाम यांच्या मध्ये काही त्रिकालबाधित नियम मध्यस्थी करत असतात. म्हणून ही जगरहाटी व्यवस्थित चालू आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे छोटेसे रोपटे इतके मोठे झाड होण्यास कारण आहे, त्याला रसाळ गोड आंबे येण्यास कारण आहे आणि काही लोकांनी त्याला दगड मारण्यास सुद्धा कारण आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आजवर लाखो रुग्णांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. कोव्हिड मध्ये माफक सरकारी दराने हजारो रुग्णांची दिवस रात्र सेवा केलेली आहे. धर्मदाय रुग्णालय असल्याने सरकारी नियमाप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील हजारो गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार केलेले आहेत. येथे पूर्ण बिल भरणाऱ्या सधन पेशंटच्या बिलाला सुद्धा कॅपिंग आहे. दीनानाथ मध्ये डॉक्टर मनमर्जी चार्ज लावू शकत नाहीत. अशा डॉक्टरला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. या रुग्णालयात आज पूर्ण बिल भरणाऱ्या श्रीमंत पेशंटला सुद्धा लवकर बेड मिळत नाहीत. गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी तर सहा-सहा महिने वाट पहावी लागते. तरी हे रुग्णालय नियमाप्रमाणे येणारा चॅरिटीचा कोटा दर वर्षी पूर्ण करते. किंबहुना सध्या ज्या पेशंट वरून गदारोळ चालू आहे त्या पेशंटने सुद्धा दोन वर्षापूर्वी चॅरिटी कोट्यातून आपल्या कॅन्सरचे ऑपरेशन दीनानाथ मध्येच करून घेतलेले आहे. दीनानाथ मध्ये IVF चे उपचार उपलब्ध असताना या पेशंटने IVF चे महागडे उपचार दुसऱ्या रुग्णालयात घेतले. कारण दीनानाथ मधील डॉक्टरांनी प्रेग्नन्सी ठेवण्याविरुद्ध सल्ला दिला होता. प्रेग्नन्सी राहिल्यावरही या पेशंटने दीनानाथ मध्ये नाव नोंदवलेले नव्हते. प्रेग्नन्सी मध्ये गुंतागुंत सुरू झाल्यावर वेळेआधी डिलिव्हरी आणि बाळांसाठी NICU चा होणारा प्रचंड खर्च समोर दिसू लागला. मग या पेशंटच्या नातेवाईकांना सातव्या महिन्यात मागे आपल्यासाठी चॅरिटी केलेल्या दीनानाथचीच आठवण झाली. चॅरिटी कोटा पूर्ण असेल तर नवीन चॅरिटी पेशंट नाकारण्याचा धर्मदाय रुग्णालयाला पूर्ण अधिकारी असतो. कुणाची चॅरिटी करायची याचा निर्णय उपचार करणारा डॉक्टर घेत नसतो. कागदपत्र तपासून हॉस्पिटल व्यवस्थापन हा निर्णय घेते. हा निर्णय घेणारे हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ धनंजय केळकर ऑपरेशन करत होते. पण ते ऑपरेशन मधून बाहेर येऊन ‘जमतील तितके पैसे भरून ऍडमिट करा’ हा त्यांचा निरोप येईपर्यंत थांबण्याचे कष्ट या रुग्णाने घेतले नाहीत. डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी झाली. इमर्जन्सी असती तर त्याच दिवशी डिलिव्हरी झाली असती. दुसऱ्या दिवशी एका फाईव स्टार रुग्णालयात या पेशंटचा सिझर दरम्यान अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला. दुर्दैवाने ऑपरेशन दरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्याने तिकडचे निष्णात डॉक्टर सुद्धा या पेशंटला वाचवू शकले नाहीत. दीनानाथच्या डॉक्टरांनी प्रेग्नसी ठेवण्या विरुद्ध दिलेला सल्ला योग्य होता यावर शिक्का मोर्तब झाले. तरी पण पेशंट दगावल्याने निर्माण झालेली सगळी अगतिकता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आणि तेथे सचोटीने काम करणाऱ्या डॉक्टरवर काढण्यात आली. महानगरपालिका निवडणूका तोंडावर असल्याने फक्त फोकस मध्ये येण्यासाठी काही उत्सुक उमेदवारांनी दीनानाथच्या डॉक्टरांच्या प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन तोडफोड केली. कॅन्सर सारख्या भयंकर आजारातून याच डॉक्टरांनी दोन वर्षांपूर्वी या पेशंटचा जीव वाचवला होता. हे कॅन्सरचे ऑपरेशन दीनानाथ मध्येच आणि ते सुद्धा चॅरिटी केस म्हणून याच डॉक्टरांनी केले होते.
वर्षानुवर्ष अनेक कष्टाळू आणि हुशार डॉक्टरांनी अविरत मेहनत करून मोठे केलेले आंब्याचे झाड म्हणजे हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय! आज या झाडाला गोड आणि रसाळ फळे लागले आहेत. सध्याच्या प्रकरणाची शून्य माहिती असलेले आणि या प्रकरणाशी काडीचा संबंध नसणारे काही लोक या झाडाला आज दगड मरताना दिसत आहे. दीनानाथ मध्ये सध्या वरवर जे काही चालले आहे त्याच्या मुळाशी प्राचीन ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ चा झगडा आहे. ‘नाही रे’ गटातील प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी जागा शोधतो आहे.
कारण आणि परिणाम यांच्या मध्ये धर्माचे अधिष्ठान असते हे त्रिकालबाधित सत्य आहे. रुग्णसेवा क्षेत्रात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आजवर असाधारण यश मिळालेले आहे. त्याचे कारण स्पष्ट आहे. कुठल्या दवाखान्यात दाखवायचे याचे व्यक्ती स्वातंत्र्य असताना एखाद्या रुग्णालयाला उतुंग यश मिळणे हे धर्म मार्गावर चालण्याचे लक्षणच आहे. अन्यथा संपूर्ण समाज मूर्ख आहे असा निष्कर्ष काढावा लागेल. जो पर्यंत दीनानाथ नित्य कामात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या यम धर्माचे पालन करत आहे तो पर्यंत या बहरलेल्या झाडाला गोड आणि रसाळ फळे येतच राहणार आहे. अशी फळे दिसल्यावर अधूनमधून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात असंतुष्ट असणारे लोक या झाडाला दगड मारत राहणार आहेत. या दोन्ही गोष्टी होतच राहणार आहेत.
दीनानाथ कडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा झालेला नाही हे नक्की. दीनानाथ कडून चॅरिटी कमिशनच्या नियमांचा भंग झाला असेल तर त्याची दखल घ्यायला सरकारने चॅरिटी कमिशनर नियुक्त केलेला आहे. ते त्याची नक्की दखल घेतील. पण सध्या दीनानाथची जी मीडिया ट्रायल सुरू आहे ती तिथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी हातोत्सही करणारी आहे.
ज्या ज्या वेळेला फळ आलेल्या झाडाला असंतुष्ट लोक असे दगड मारू लागतील त्या त्या वेळी धर्म मार्गावर चाललेल्या अशा पीडित लोकांची पाठराखण करणे हे समाजातील प्रत्येक सुज्ञ मनुष्याचे कर्तव्य आहे. त्यातच त्याचे हित दडलेले आहे. कारण ज्या समाजात धर्म मार्गावर चालणे मुश्किल होते त्या समाजात अधर्म बोकाळतो. त्याचा त्रास समाजातील प्रत्येकाला होऊ लागतो. म्हणूनच ‘धर्मो रक्षिती रक्षता’ असे म्हटले जाते.
त्या योगे केलेला हा प्रपंच!
डॉ गोपाळकृष्ण गावडे
स्त्रीरोग तज्ञ
पुणे.