दि . १९ ( पीसीबी ) – थेरगाव,वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, रहाटणी परिसरातील गरिब आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर अन्याय करणाऱ्या डीपी रस्त्याच्या प्रस्तावाला विरोध करत स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या वतीने घराचा सत्याग्रह करत साखळी उपोषण सुरू सुरू करण्यात आले आहे. त्याचा आजचा चौथा दिवस आहे.धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांचा आवाज बुलंद होत आहे.
थेरगाव व वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर परिसरातील हजारो रहिवासी नागरिकांना त्यांच्या जमिनीवरून बेघर करण्याचा घाट डीपी रस्त्याच्या नावाखाली घातला जात आहे.
असा आरोप करताना येळकर पाटील म्हणाले.
येथील नागरिकांचा एवढा महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न स्थानिक आमदारांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला पण तो दिशाभूल करणारा होता. त्यांनी याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती. मात्र त्यांनी असे न करता येथील नागरिकांच्या घराच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय हा औचित्याचा मुद्दा म्हणून मांडला. हा औचित्याचा मुद्दा सभागृहात सदस्यांनी मांडल्यानंतर त्यावर मा.मंत्री महोदयांनी त्वरित निवेदन करण्याची सक्ती नसते,सदस्य मुद्दा मांडत असताना संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहामध्ये हजर राहण्याचे बंधनही नसते. तसेच सदस्यांनी औचित्याचा मुद्दा मांडल्यानंतर मा. मंत्री महोदय यांना लगेच काही स्पष्टीकरण करावयाचे असल्यास अध्यक्षांच्या परवानगीने ते करू शकतात, मात्र त्यावर कोणतीही अनुपुरक प्रश्न उत्तरे होत नाहीत. जर मंत्री हजर राहणार नसतील, यावर चर्चा होणार नसेल,याला मंत्री उत्तर देण्यास बंधनकारक नसतील तर हा गंभीर आणि हजारो कुटुंबांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न औचित्याचा मुद्दा म्हणून मांडणे ही येथील रहिवाशी नागरिकांची जाणीवपूर्वक खूप मोठी पुन्हा केलेली फसवणूक आहे. त्यामुळे ४० वर्ष फसवणूक करून सुद्धा परत तेच होत आहे,त्यामुळे आमदारांच्या विरोधात येथील जनतेचा रोष आणखी वाढत आहे. यावरून आमदारांना या प्रश्नाचे गांभीर्य नसून फक्त निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे असे धनाजी येळकर पाटील म्हणाले.
या साखळी उपोषणाच्या माध्यमातून डी पी विरोधात वातावरण तापत आहे,रहिवाशी नागरिकांच्या घराच्या प्रॉपर्टी कार्ड च्या लढ्याची तीव्रता आणखी वाढत आहे. हे दोन्ही प्रश्न त्वरित मार्गी नाही लागल्यास प्रशासन व स्थानिक सत्ताधाऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
त्यासाठी आमची पूर्ण तयारी चालू आहे असे घर बचाव चे समन्वयक शिवाजी इबीतदार म्हणाले.
यावेळी उपोषण स्थळी प्रमोद शिंदे, विशाल बारणे, महेश बारणे, गणेश पाडुळे, व्यंकट पवार,राजश्री शिरवळकर,बबिता ढगे, अर्चना मेंगडे, शांताराम धुमाळ, मनोज पाटील,देवेंद्र भदाणे, किशोर पाटील, रामलिंग तोडकर, बालाजी ढगे, राजू पवार, गणेश सरकटे, यशवंत उबाळे, अश्विनी पाटील, रावसाहेब गंगाधरे, अमित मोरे हे समन्वयक व नागरिक उपस्थित होते.