बाकीच्यांनी काय करावं? गोट्या खेळाव्यात का ?

0
36

बारामती, दि. १७ – राज्यातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज लढत अशी वर्णन केल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये आता प्रचाराची रंगत शिगेला पोहोचली आहे. सोमवारी बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या सांगता सभा होणार आहेत. त्यापूर्वी अजित पवार यांनी रविवारी पुन्हा एकदा भावनिक विधान करत बारामतीकरांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटायला लागलं आहे की, आपण फार काम करतो त्याची किंमत बारामतीकरांना राहिली नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

परवा साहेब म्हणाले की, मी तीस वर्षे काम केलं, आता पुढच्याला संधी द्या. मला तर काय कळतच नाही,पवारांशिवाय दुसरा कोणी हाय का नाय ? बाकीच्यांनी काय करावं? गोट्या खेळाव्यात का ? सगळं एकाच घरात. ज्याला संधी मिळते त्याच्यात कर्तृत्व गाजवण्याची धमक असावी लागते, याचा माळेगावकरांनी विचार करावा, असे अजित पवार यांनी म्हटले. आदरणीय साहेबांनी सांगितलं की, दीड वर्षानंतर मी आता राज्यसभा वगैरे जाणार नाही यापासून बाजूला राहणार. पण यानंतर बारामती तालुक्याला कोण पुढे नेईल ? एवढं जर समजलं तर माळेगावकरांना विनंती आहे. साहेबांना पाहुन सुप्रियाला मतदान केलं, आता मला विधानसभेला मतदान करा, असे भावनिक आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केले.

शंभर शंभर कोटीचे प्रोजेक्ट राबवायचे साखर कारखान्याचे चांगले भाव द्यायचे, विकास करायचा. तरीदेखील माळेगावमध्ये काटे आणि तावरे काय चाललयं हे मला कळत नाही. तुम्हाला जर मदत करायची असेल तर करा माझा काय आग्रह नाही पण यापुढे काही गोष्ट ठरवल्या आहेत. माळेगाव भागात ऊसाशिवाय काही पिकत नव्हतं, पण आज चित्र बदलले. मला तर काय काय लोकांचं कळत नाही. मागे काही सहकारी म्हणाले दादांचा आदर राखू, मान राखू, आम्ही ताईंना लोकसभेला जायचं त्या ठिकाणी ठरवलं, विधानसभेला आम्ही तुमचा विचार करू. पण माझ्याकडे एक बोलायचं पाठवलं की दुसरंच करायचं. 1990 पासून मी निवडणुकीला सामोरा जातोय. तुम्ही ती जबाबदारी माझ्यावर दिली. मी कधीही सभेला पैसे देऊन माणसं आणली नाहीत. चुकीच्या सवयी लावून फार सोपं असतं. पण चांगल्या सवयी लावून विचार आणि पुढे जाणं यात खरं लोकांचे भले आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

कॅनलचं पाणी बंद झाल्यावर तुम्हाला माझी आठवण येईल: अजित पवार
लाडक्या बहीण योजनेचा गरीब महिलांना फायदा झाला, शून्य वीज बिल आपण देत आहोत, याचा विचार करा. दुधाचं अनुदान वाढवलं. मी उद्या सभा घेणार आहे त्यात विस्तृतपणे बोलणार आहे. त्यांनी पण सभा लावली आहे ते त्यांचे मत मांडतील मी माझे मत मांडेल. बारामतीची विकासाची वाटचाल चालू ठेवायचे असेल तर मला मतदान करा. लाडकी बहीण योजना, वीज बिल माफीची योजना, या योजना चालू ठेवायचे असतील तर घड्याळाला मतदान करा. मी यावेळी लक्ष घातलं नसतं ना तर नदीला पण आणि कॅनलला पण अडचण आली असती. मी न विचारताच करतोय पाणी येतय सगळं होतंय एकदा जर पाणी बंद झालं ना मग अजित पवारची आठवण येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमची प्रशासनावर पकड आहे,म्हणून कामे होतात. आजुबाजूच्या तालुक्यात जाऊन जरा बघा मग कळेल तुमचा लोकप्रतिनिधी काय करू शकतो 9000 कोटी रुपये कसं आणू शकतो,पण याची किंमत राहिना, याकडे अजित पवारांनी बारामतीकरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मी तिथे रस्ते मंजूर करतो त्याची तुम्हाला किंमत राहत नाही, सहजासहजी मंजूर होतेय. 30 ते 35 टक्के मतं माळेगावमध्ये सुनेत्राला मिळाली. मला सांगितलं असतं तर उभंच केलं नसतं, झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. संस्था चांगल्या चालवायच्या असतील तर तिथे आधारित दबदबा लागतो. एकेकाळी बारामतीपेक्षा फलटण पुढे होते, आज आपण त्यांच्यापुढे आहोत. एकाने सांगावा की, अजित पवार आम्ही संस्था चांगली चालवत असताना तुम्ही मदत केली नाही, असा सवालही अजित पवार यांनी माळेगावमधील जनतेला विचारला