बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना हाकला – आमदार महेश लांडगे

0
31

मुंबई, दि. 09 (पीसीबी) -पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनासह अन्य सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा आणि कारवाई सुरू करावी, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली. दरम्यान, या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरीत कारवाईचे निर्देश पोलिसांना दिल्याची माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

चिखली-कुदळवाडी येथे सोमवारी पहाटे भंगार दुकांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेमध्ये १५ ते २० दुकाने खाक झाल्याचे वृत्त आहे. मुंबईमध्ये राज्य सरकारचे विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी या मुद्याकडे लक्ष वेधले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र दिले आहे. याची तातडीने दखल घेत कारवाईचे निर्देश दिले आहेत.

आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील चिखली-कुदळवाडी या भागात मोठ्या प्रमाणात भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. अनेकदा तक्रार आणि कारवाई करुनही पुन्हा या ठिकाणी भंगारचा धंदा केला जातो. या ठिकाणी अनधिकृतपणे कचरा जाळला जातो. त्यामुळे अनेकदार आगीच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, परिसरातील नागरिक, सोसायटीधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

सोमवारी पहाटे पुन्हा एकदा चिखलीमध्ये गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी महानगरपालिकेची नऊ अग्निशमन दलाची वाहनांच्या माध्यमातून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत १५ ते २० भंगार दुकाने खाक झाली आहे. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट दिसत असल्याने ही आग किती भीषण होती, याचा अंदाज येतो. पर्यावरण आणि नागरी आरोग्याची हानी मोठ्याप्रमाणात होते आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न…

गंभीर बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात वास्तव्य करणाऱ्या ७० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. काही घुसखोर देशविघातक कृत्यांशी संबंधित आहेत, हेसुद्धा तपासात समोर आले आहे. बहुतांशी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे अशा भंगार दुकानांवर काम करतात. पिंपरी-चिंचवड पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी सातत्त्याने कारवाई सुरू ठेवली आहे. असे असले तरी, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे, अशी भूमिका आमदार लांडगे मांडली. त्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत.