बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रांच्या आधारे १० पासपोर्ट

0
263

पुणे, दि. २९ (पीसीबी) : पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे १० पारपत्र काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी २९ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती.

कारवाईनंतर पोलिसांनी बांगलादेशींची चौकशी केली. तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी १० पारपत्र काढल्याचे उघडकीस आले. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र काढल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने आणि पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी पारपत्र पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परदेशी नागरिकांना भारतीय पारपत्र मिळवून देणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची व्यक्तिगत चौकशी करावी. तसेच अर्जदार नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करावी. परिसरातील नागरिकांकडे वास्तव्याबाबत चौकशी करण्यात यावी, असे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. आधारकार्ड, जन्म दाखला, तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणाने करावी, असे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.