बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचे सरकार

0
284

ढाका, दि. ८ (पीसीबी) – बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा आवामी लीगचं सरकार येणार आहे आणि शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत. भारताच्या शेजारी देशात रविवारी (७ डिसेंबर) सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आवामी लीगने ३०० पैकी दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना २००९ मध्ये पहिल्यांदा बांगलादेशच्या पतंप्रधान झाल्या होत्या. तेव्हापासून शेख हसीना याच बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. यापूर्वी १९९१ ते १९९६ अशी पाच वर्षे शेख हसीना बांगलादेशच्या पतप्रधान होत्या. बांगलादेशमधील ३०० पैकी २९९ जागांवर रविवारी निवडणूक पार पडली. यापैकी २१६ जागा आवामी लीगने जिंकल्या आहेत. बागलादेशमध्ये रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालू होती. सोमवारी (८ डिसेंबर) पहाटे हाती आलेल्या निकालानुसार बांगलादेश जातीय पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. तर ६२ जागांवर अपक्ष उमेदवार जिंकले आहेत.

पंतप्रधान शेख हसीना या लोकसभा मतदारसंघ गोपालगंज-३ मधून मोठ्या मतफरकाने जिंकल्या आहेत. त्यांना २,४९,९६५ मतं मिळाली आहेत. त्यांच्याविरोधात उभे राहिलेले उमेदवार एम. निजाम उद्दीन यांना केवळ ४६९ मतं मिळाली आहेत. या जागेवर निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांना २०० मतंसुद्धा मिळाली नाहीत. शेख हसीना गोपालगंज-३ मधून १९८६ पासून सलग आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

बांगलादेशात कमी मतदान
बांगलादेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीने (बीएनपी) रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे तिथे अपेक्षेपेक्षा कमी मतदान झालं. प्राथमिक अंदाजानुसार, दिवसभरात केवळ ४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाच वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली होती. एकूण ३०० मतदारसंघांपैकी २९९ मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान झाले. एका मतदारसंघात अवामी लीगच्या उमेदवाराच्या मृत्यूमुळे या जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीने याआधी २०१४ च्या निवडणुकीवरही बहिष्कार घातला होता. परंतु, २०१८ मध्ये या पक्षाने निवडणूक लढवली होती. दरम्यान, बीएनपीबरोबर इतर १५ पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. यासह बीएनपीच्या नेत्यांनी ४८ तास उपोषणही केलं. तसेच त्यांनी देशभरातील जनतेला मतदान न करण्याचं आवाहन केलं. दुसऱ्या बाजूला देशात केवळ ४० टक्के मतदान झाल्यामुळे बीएनपी नेते म्हणाले, मतदानाची आकडेवारी पाहून सिद्ध झालं आहे की, आमचा बहिष्कार यशस्वी झाला.