दि.०९(पीसीबी)-बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले. बांगलादेशमधील हिंदूंनी जर स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना जगभरातील हिंदूंचा पाठिंबा लाभेल, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले. ‘संघ प्रवासाची १०० वर्षे, नवे क्षितीज’, या विषयावर वरळीतील नेहरु सेंटरमध्ये दोन दिवस व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानात बोलत असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे.
“बांगलादेशमध्ये जवळपास १.२५ कोटी हिंदू आहेत. जर त्यांनी तिथेच राहून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला तर जगभरातील हिंदूंकडून त्यांना पाठिंबा मिळेल”, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी दुसऱ्या दिवशी बोलताना केले.
बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसक आंदोलन
बांगलादेशमध्ये डिसेंबर महिन्यात मोठा हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला. बंडखोर विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याची हत्या झाल्यानंतर देशभरातून हिंदूंविरोधात अत्याचाराची मालिका सुरू झाली. अनेक हिंदू तरूणांची मॉब लिंचिंगमध्ये हत्या करण्यात आली. त्यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावल्यापासून हिंदूंवर अत्याचाराची सुरुवात झाली होती. मात्र २०२५ च्या अखेरीस त्याला आणखी हिंसक रुप प्राप्त झाले.
शरीफ हादीच्या मृत्यूनंतर हिंदू व्यापारी, तरूण आणि महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली. जमावाने संघटित होऊन हिंदूंना लक्ष्य करण्यात आली. अतिशय निर्घृणपणे अनेकांची हत्या करण्यात आली.
घुसखोरांविरोधात भागवत यांचा इशारा
सरसंघचालक मोहन भागवत यांनी घुसखोरांविरोधातही भाष्य केले. ते म्हणाले, अवैध घुसखोरांना शोधून त्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. घुसखोरांना नोकरी देऊ नये. त्यांच्याबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेद्वारे देशात घुसखोरांना उघड करण्यात येत आहे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
म्हणाले, “यापुढे मुस्लिमांनाही…”
मोहन भागवत पुढे म्हणाले, सरकारला घुसखोरांविरोधात बरेच काही करायचे आहे. त्यांना शोधून देशाबाहेर काढावे लागेल. आतापर्यंत हे घडत नव्हते. परंतु ते हळूहळू सुरू झाले आहे. ही मोहीम पुढे जाईल. जेव्हा जनगणना आणि एसआयआर सारख्या प्रक्रिया राबवल्या जातात, तेव्हा असे प्रकार समोर येतात. जे देशाचे नागरिकच नाहीत, ते आपोआप या प्रक्रियेतून वगळले जातील.







































