बांगलादेशच्या खासदाराची हत्या, देहाचे तुकडे करून बॅगेेत भरले

0
149

कोलकाता: बांग्लादेशातील सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे खासदार अनवारुल अजीम अन्वर यांची कोलकात्यात हत्या झाली. या प्रकरणात आता धक्कादायक तपशील उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास बंगालच्या सीआयडीकडून सुरु आहे. खासदार अन्वर यांची हत्या त्यांच्याच बालमित्रानं केल्याचं उघडकीस आलं आहे. हत्या प्रकरणात अन्वर यांच्या व्यावसायिक भागिदाराचाही समावेश आहे.

ढाका ट्रिब्यूननं दिलेल्या वृत्तानुसार, खासदार अन्वर यांचा बालमित्र आणि व्यावसायिक भागीदार अकतारुजज्जमान शाहीन हाच हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. अन्वर यांचा आणखी एक मित्र अमानुल्लाह अमान यानंही हत्या करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार अनवारुल यांच्या हत्येची योजना आखण्यासाठीच शाहीन कोलकात्याला आला होता. हत्येचा प्लान यशस्वी केल्यानंतर तो बांग्लादेशला परतला. अमानसह सहा जणांनी अनवारुल यांची उशीनं तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर अन्वर यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते ट्रॉली बॅगमध्ये टाकले आणि ती बॅग एका अज्ञात ठिकाणी फेकून दिली.

ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या हेर विभागानं हत्येच्या कटाचा पर्दाफाश केला. या प्रकरणात हत्येच्या आरोपाखाली तिघांना अटक करण्यात आली आहे. अनवारुन यांची मुलगी मुमतारिन फिरदोस डोरिन यांनी बुधवारी शेर-ए-बांग्ला नगर पोलीस ठाण्यात हत्येची तक्रार नोंदवली होती. त्याचवेळी कोलकात्यातही एक वेगळी तक्रार नोंदवण्याची तयारी सुरु होती. कोलकात्यात पोलिसांनी अनवारुल यांच्या मृतदेहाचे तुकडे घेऊन जाणाऱ्या कार चालकाला अटक केली होती.