बहुजन समाज पार्टीच्या परिवर्तन मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे : डॉ. हुलगेश चलवादी

0
294

– गुरुवारी बसपाचा पिंपरीत परिवर्तन मोर्चा

पिंपरी,दि.२० (पीसीबी) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, गुंठेवारीतील बांधकाम नियमित करण्याबाबत शुल्क कमी करणे, महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत उपचार, अनधिकृत बांधकाम, माता रमाई यांचे स्मारक, राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक अशा अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी आणि या विषयांचा महानगरपालिकेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवारी (दि.२२) सकाळी ११:३० वाजता बहुजन समाज पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर परिवर्तन मोर्चा काढण्यात येणार आहे. बसपाचे प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ आदेशाने आयोजित केलेल्या या मोर्चात शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदिप लगाडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशिल गवळी, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गायकवाड, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अनिल रणनवरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. चलवादी यांनी सांगितले की, पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार राज्य‍ाच्या विविध भागांतील झोपडपट्टयांमध्ये राहणारे नागरिक, गरिब, वंचिताचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी बहुजन समाज पार्टी त्या-त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात एसआरए अंतर्गत झोपडपट्टी धारकांचे जागेवरच पुनर्वसन करावे आणि प्रत्येक झोपडीधारकास पाचशे स्क्वेअर फुटांचे घर मिळावे. ही सर्व झोपडपट्टी धारकांची मुख्य मागणी आहे. तसेच रेल्वे हद्दीतील बाधित झोपडपट्टी धारकांचे आधी पुनर्वसन करावे मगच स्थलांतर करावे ही प्रामुख्याने बसपाची मागणी आहे.बसपाचे प्रदेश सचिव सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, मागील दोन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील रुग्णालय व दवाखान्यात उपचारांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. ही दरवाढ रद्द करून गोरगरीब नागरिकांना या सर्व रुग्णालय व दवाखान्यांमध्ये मोफत उपचार मिळावे. ही शहरातील सर्व नागरिकांची मुख्य मागणी आहे. तसेच महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप त्वरित करावे. शहरांमध्ये लाखो बांधकामे गुंठेवारीच्या नियमात बसत आहेत परंतु या नियमाचे शुल्क जास्त असल्यामुळे कष्टकरी कामगारांना गोरगरिबांना या गुंठेवारीचे बांधकाम नियमित करण्यात अडचणी येत आहेत याचे शुल्क देखील कमी करावे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रशस्त जागेत स्मारक उभारले जावे तसेच राष्ट्रपिता महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम त्वरित चालू करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे असणाऱ्या आरक्षित जागेत माता रमाईच्या स्मारकाचे काम सुरू करावे.

बसपा शहर अध्यक्ष सुशील गवळी यांनी सांगितले की, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे “गरिबांना भय व श्रीमंतांना अभय” या पद्धतीने काम चालू आहे हे ताबडतोब थांबवावे. मागील अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. मागील वर्षी आणि यावर्षी देखील पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरातील नागरिकांना २४ तास पाणी मिळत नाही. हा प्रलंबित प्रश्न देखील नवीन आयुक्त यांनी प्राधान्याने सोडवावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागात कंत्राटी सर्व कचरावेचक कामगारांना मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार “समान काम समान वेतन” देण्यात यावे, तसेच वैद्यकीय उपचाराकरिता किमान पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा.

अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या परिवर्तन मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.हा परिवर्तन मोर्चा गुरुवारी सकाळी ११:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे मुंबई महामार्गावरून मोरवाडी चौकातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे येणार आहे.