बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याचे समजले; खदानीत बोलावून……

0
134

देहूरोड, दि. २० (पीसीबी) : बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाचा खून केला. तरुणाला खदानी मध्ये ढकलून देत त्यास ठार मारले. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सकाळी साडेआठ वाजता देहूरोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी उघडकीस आली.

अजय जोगिंदर लुक्कड (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल चंदू सकट (वय 18), प्रेम सचिन मोरे (वय 19), ओमकार उर्फ गणेश रवींद्र पवार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहूरोड – कात्रज बायपास रोडवर असलेल्या ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदान मध्ये शुक्रवारी सकाळी एका तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अजय लुक्कड हा तरुण मृतावस्थेत आढळून आला.

अजय याचा खून केल्याची शक्यता लक्षात घेत देहूरोड पोलिसांनी तपास केला. काही वेळेत पोलिसांनी तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतले. अजय लुक्कड याचे आरोपी कुणाल सकट याच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. त्या कारणावरून कुणाल याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून अजय याला देहूरोड पोलीस ठाण्याजवळील खदानी जवळ बोलावून घेतले. तिथून आरोपींनी अजयला खदानीत ढकलून दिले. त्यामध्ये अजयचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.