बलाढ्य भाजपसमोर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा निभाव लागेल का ?

0
399

– आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काटे की टक्कर होणार हे जवळपास निश्चित आहे. दोन्ही पक्षांसाठी ही आरपारची लढाई असेल. महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आतापासूनच जीवाचे रान करत आहेत. नव्या पिढीला सोबत घेऊन त्यांचे काम सुरू आहे. पण, त्यांना पक्षातील वरिष्ठांचे किती पाठबळ मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. केंद्रातील मोदींची आणि राज्यातील शिंदे-फडणवीस यांची सत्ता, शहरात तीन आमदार असलेल्या बलाढ्य भाजपसमोर गव्हाणे यांचा निभाव लागेल का, हाही एक प्रश्न आहे. पालिकेत सत्ता आणली तर गव्हाणे यांचा 2024 मध्ये भोसरीतून मुंबईला जाण्याचा मार्ग नक्कीच सुकर राहील, यात शंका नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक कधी होईल याबाबत आत्ता कोणीच ठामपणे काहीच सांगू शकत नाही. तीन सदस्यांचा प्रभाग पुन्हा चार सदस्यांचा कऱण्याचा फडणवीसांचा खटाटोप आहे. राज्याच्या नगरविकास विभागानेही पुन्हा नव्याने प्रभाग रचना कऱण्याचे आदेश दिलेत, तर दुसरीकडे याच विषयावर सर्वोच्च न्यायालयातील केस प्रलंबीत आहे. त्यामुळे किमान जानेवारी महिन्यात नाही तर एप्रिल-मे मध्ये निवडणूक होईल, असे आत्ता सांगण्यात येते. जानेवारी महिन्यात निवडणूक होईल या शक्यतेने राजकीय पक्षांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. राष्ट्रवादीही त्यात मागे नाही.
अजित पवार यांचा तोंडचा घास मागीलवेळी भाजपने काढून घेतला. आता पुन्हा गेलेली सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते तयारीला लागलेत. राष्ट्रवादीची संपूर्ण भिस्त आता अजित गव्हाणे यांच्यावर आहे. केंद्रात नरेंद्र मोदी- राहुल गांधी तर राज्यात देवेंद्र फडणवीस- उध्दव ठाकरे किंवा अजित पवार अशी तुलना होते. आता पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे आणि विरोधात अजित गव्हाणे अशी तुलना होणार.
गव्हाणे यांची कार्यक्षम, शांत, संयमी, मितभाषी, निष्कलंक, उच्चशिक्षित अशी अत्यंत सभ्य, सुसंस्कृत अशी प्रतिम आहे. तिकडे आमदार लांडगे यांची भाजपचा आक्रमक, रोखठोक, दमदार आणि रोज वर्तमानपत्रांतून झळकणारे कार्यक्षम आमदार अशी दुसरी तोडिसतोड प्रतिमा आहे. महापालिकेचे मैदान तोंडावर आहे तर विधानसभेला दोन वर्षे आहेत. गव्हाणे हे पैलवान आमदार लांडगे यांच्यापुढे टिकतात की नांगी टाकतात ते आता काळच ठरवेल.
मरगळ आलेल्या राष्ट्रवादी पक्षाची सुत्रे साधारणतः वर्षापूर्वी म्हणजे 12 फेब्रुवारी 2022 रोजी गव्हाणे यांच्याकडे आली. त्यावेळी हे यांचे काम नाही, असे वाटत होते. प्रत्यक्षात
भाजपच्या भ्रष्ट कारभारा विरोधात सातत्याने आवाज उठवून तब्बल १० हजार कार्यकर्त्यांचा रेकॉर्डब्रेक मोर्चा त्यांनी काढला. तेव्हापासून भाजपची झोपच उडाली. राष्ट्रवादीत नवचैतन्य सळसळले आणि पुन्हा महापालिका घेण्याचे स्वप्न पडू लागले. गव्हाणे हे तसे जुने खिलाडी. मूळ रा.स्व.संघाचे अत्यंत संस्कारी जडणघडण असलेले व्यक्तीमत्व. भाजपचे नगरसेवक म्हणून कारकिर्द सुरू झाली आणि नंतर राष्ट्रवादीचे प्रतिनिधीत्व करत सलग चार टर्म पूर्ण केल्या. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. शहराच्या राजकारणाची त्यांना संपूर्ण जाण आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या सावलीत गव्हाणे वाढले. राजकारणाची बाराखडी त्यांना वडिलांकडूनच मिळाली, पण प्रात्यक्षिक अंकुश लांडगे, विलास लांडे यांच्याकडून शिकले. त्यामुळे नव्या-जुन्या सर्वांचा मेळ घालणे त्यांना चागंले जमते. तेच त्यांचे भांडवल असल्याने भाजपच्या काही मंडळींनाही त्यांची भूरळ पडते,पण आमदार लांडगे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.

महाविकास आघाडीची सत्ता असताना झालेली प्रभाग रचना शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केली आहे. ही प्रभाग रचना राष्ट्रवादीला अनुकूल होती असे सांगितले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होईल असा दावा केला जात होता. पण, नवीन सरकारने आता नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भाजपच्या सोईची प्रभाग रचना होईल, याबाबत तिळमात्र शंका नाही. त्यामुळे आगामी पालिकेची निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी नसेल. पूर्वी बारामतीतून रसद मिळायची आता त्याचीही शाश्वती नाही. राज्यात सत्ता नाही, प्रशासकिय यंत्रणा सोबत नसेल. अजित पवार यांच्याबाबत ते भाजपमध्ये जाणार अशा वावड्या सुरू आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत गव्हाणे यांना खिंड लढवायची आहे.

शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेच अजून म्हणावे असे सक्रिय नाहीत. अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपकडे डोळे लावून बसलेत. शेवटी जिकडे घुगऱ्या तिकडे उदोउदो हा निसर्गाचा नियम आहे. नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपल्याने माजी झालेले विरोधी पक्षनेत्यांसह काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजपकडे जाऊ इच्छिणा-यांना समजावणे, त्यांना पक्षात ठेवण्याचे पहिले मोठे आव्हान गव्हाणे यांच्यासमोर असेल. पक्षातील जुन्या, जाणत्या नेत्यांना सोबत घ्यावे लागेल. नव्या-जुण्यांची भक्कम मोट बांधावी लागेल. गटबाजी संपावीच लागेल. सर्वांना सोबत, एकोप्याने, कोणतेही मतभेद, रुसवे-फुगवे होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागेल. भाजपच्या चुकीच्या कामांविरोधात आणखी तीव्रपणे सातत्याने आवाज उठवावा लागेल. मागील पंचवार्षिकमधील चुकीची असंख्य कामे, कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाराचा मुद्दा जनतेला पटवून द्यावा लागेल. घरोघरी जाऊन भाजपच्या भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त घोषणेचा कसा बट्याबोळ झाला हे सांगावे लागेल. भाजपने पाच वर्षांत अवैध बांधकामे नियमीत करण्याच आश्वासन दिले त्याचे काय झाले याचा जाब विचारावा लागेल. शास्तीकर रद्द कऱण्याची भाजपची घोषणा हवेत विरली, रेडझोन सोडविण्याचे आश्वासन ते विसरलेत. असे शेकडो मुद्दे आहेत. फुटकळ आंदोलनाचे दोन-चार पेपरात फोटो आले म्हणून प्रचार होत नाही. जोपर्यंत राष्ट्रवादीची गव्हाणे यांची फौज भाजपवर चाल करून जात नाही तोवर राष्ट्रवादीचे खरे नाही.

समोर साम-दाम-दंड भेद नितीचा अवलंब करणारा भाजप आहे. भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे सलग दुस-यावेळी आमदार आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये पालिकेतील कारभार त्यांनीच अक्षरशः रेटून नेला आणि सत्ता राबवून दाखवली. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे धोरण त्यांनी राबविले. ही सर्व आव्हाने गव्हाणे यांना पेलावी लागतील. या आव्हानांवर मात करत गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यास त्यांचे राजकीय वजन वाढेल. शहराचे प्रमुख नेते म्हणून जनमान्यता मिळेल. शिवाय 2024 मध्ये भोसरीतून मुंबईला जाण्याचा मार्ग सुकर होईल.

बनसोडे-लांडे-पानसरे ‘त्रिकुटा’ची साथ मिळेल का?
एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे एकमेवर आमदार आहेत. पिंपरी मतदारसंघात त्यांना माणणारा वर्ग आहे. पण, आमदार बनसोडे पक्षापासून फटकून राहतात. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे तर गव्हाणे यांचे काका आहेत. लांडे यांनी आपला राजकीय वारसदार अजित गव्हाणे हेच असल्याचे जाहीर सांगितले. पण, लांडे यांना शहरातील पवार म्हणून ओळखले जाते, इतके लांडे धूर्त आणि चतूर राजकारणी आहेत. भोसरी मतदारसंघातील जुने-जाणते लोक लांडे यांना मानतात. त्यांच्या शब्दाला अद्यापही भोसरीत वजन आहे. त्यामुळे लांडे यांनी निस्वार्थपणे शहराध्यक्ष गव्हाणे यांना साथ दिल्यास, भोसरीची जबाबदारी स्वत: सांभाळल्यास राष्ट्रवादीची नगरसेवकसंख्या वाढण्यास मदत होऊ शकेल. माजी महापौर आझमभाई पानसरे यांचेही पिंपरी विधानसभा मतदारसंघासह शहराच्या राजकारणात चांगले वजन आहे. शहरातील अल्पसंख्याक समुदाय पानसरे यांच्या पाठिशी राहतो. हा मतदार पानसरे यांनी राष्ट्रवादीकडे वळविल्यास त्याचा सत्ता येण्यासाठी फायदा होईल. बनसोडे, लांडे, पानसरे यांनी शहराध्यक्ष गव्हाणे यांना मनापासून साथ दिल्यास राष्ट्रवादीची सत्ता येवू शकते, अन्यथा पुन्हा शतप्रतिशत भाजपचा नारा प्रत्यक्षात येऊ शकतो.