बनावट IAS, ज्योती मिश्राचे कारनामे एखाद्या सिनेमालाही लाजवेल असे

0
100

महाराष्ट्र, १९ जुलै (पीसीबी) – पुण्याची ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. पूजा खेडकरचा पराक्राम समोर आल्यानंतर देशभरातून अशीच अनेक प्रकरणं समोर येत आहेत. दरवर्षीची UPSC टॉपर लिस्ट काढून नेटकरी आपल्या पद्धतीने शोधमोहीम राबवत आहेत. त्यातच आता ज्योती मिश्रा हिचे नाव समोर आलेय. ज्योती मिश्राचे कारनामे एखाद्या सिनेमालाही लाजवेल असे आहेत. ज्योती मिश्रा हिनं चक्क युपीएससीमध्ये पास न होता… बनावट कागदपत्राच्या आधारावर सर्वांनाच आपण पास झाल्याचं भासवलं. तब्बल दोन वर्षे ती सर्वांना खोटं बोलत होती. कुटुंबियांपासून ते गाव, जिल्ह्यातील लोकांनाही तिने आपण पास झाल्याचं भासवलं. इतकेच काय तर पास झाल्यानिमित्त तिचा त्यावेळी सत्कार समारंभही झाला होता. त्याशिवाय उत्तर प्रदेश पोलिसांच्या ट्विटर खात्यावरुन तिच्यासाठी पोस्टही करण्यात आली होती. पण आता एका युजरने 2021 चा युपीएससीचा निकाल शोधला. त्यानंतर निकालात नाव असलेली ज्योती आणि IFS म्हणून वावरत असलेली ज्योती या वेगवेगळ्या असल्याचे समोर आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर ज्योतीची मात्र कोंडी झाली.

2021 मध्ये झालेल्या युपीएससी परिक्षेचा निकाल 2022 मध्ये आला होता. नेटकऱ्याने 2022 मध्ये UPSC परीक्षेत निवड झाल्याचा दावा करणाऱ्या ज्योती मिश्राचे प्रकरण समोर आणले आहे. यासंदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. जनरल कोट्यातील ज्योती मिश्रा एससी श्रेणीतून आयएफएस झाल्याचं एका नेटकऱ्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण ज्योती मिश्राचं सगळं बिंग उघडं झालं, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कुणी विचारही केला नसेल, इतका मोठा पराक्रम ज्योती मिश्राने केला आहे. ज्योती मिश्राने बनावट सरकारी कागदपत्रेही तयार केली. इतकेच काय तर तिने आयडी कार्डही तयार केले होते.

ज्योती मिश्राचं स्पष्टीकरण, अन्…
आरक्षण कोट्यावर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये ज्योती मिश्रा यांची एससी कोट्यातून निवड झाल्याचे दाखवण्यात आले. यानंतर ज्योती मिश्रा यांनी स्वतःला IFS म्हणून सांगून मॅड्रिड दूतावासात कार्यकरत असल्याचं सांगितलं होतं. ज्योती मिश्राच्या पोस्टच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेक पोस्ट करण्यात आल्या. रायबरेलीची मुलगी ब्राह्मण असल्याने तिला टार्गेट केले जात असल्याचे यामधून सांगण्यात आले. पण नंतर ज्योती मिश्रा हिने आपली स्पष्टीकरणाची पोस्ट डिलिट केली. याप्रकरणी तपास करण्यात आला.

एक खोटं लपवण्यासाठी….
ज्योती मिश्रा हिच्याबाबात अधिक तपास करण्यात आला, त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. ज्योती मिश्रा हिची यूपीएससीमध्ये कधीही निवड झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे ज्योतीला कधीही मॅड्रिडमध्ये पोस्ट करण्यात आले नाही, असेही समोर आले. 2022 मध्ये यूपी पोलिसांनी ज्योतीच्या निवडीबद्दल सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले होते. कारण, ज्योतीचे वडील यूपी पोलिसात उपनिरीक्षकपदावर काम करत आहेत. त्यावेळी यूपीएससीमध्ये निवड झाल्याची खोटी माहितीही ज्योतीने कुटुंबीयांना दिली होती. पण हे एक खोटे लपवण्यासाठी ज्योती मिश्रा हिने एकामागून एक अनेक खोटे बोलले. एक खोटं लपवण्यासाठी ज्योतीला वारंवार खोटं बोलावं लागलं, त्याशिवाय खोटे पुरावे पेरावे लागले. तिने अनेक बनावट कागदपत्रे तयार केली, जी कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.

इतके दिवस कसं लपवलं खोटं?
ज्योती मिश्राने आयएएसच्या कोचिंगसाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. अखेर मुलीच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले. मुलीच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम त्यांनी कोचिंगसाठी दिली. ज्योतीने 2020 आणि 2021 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. पण निवड झाली नाही. 2022 मध्ये जेव्हा परीक्षेचा निकाल लागला तेव्हा बहीण आरतीला ज्योतीचं नाव दिसले. यानंतर आरतीने ज्योतीला फोन करून निकालाबाबात सांगितलं. तूच आहेस का? असा तिने प्रश्न केला. पुन्हा पुन्हा नापास होत असलेल्या ज्योती मिश्राने, हो ती मीच आहे. असे खोटं सांगितलं. पण हे खोटे लपवण्यासाठी बनावट पासपोर्टपासून ते बनावट नियुक्तीपत्रे आणि अगदी बनावट ओळखपत्रापर्यंत सर्व काही बनवण्यात आले. पण अखेर दोन वर्षानंतर ही खोटं समोर आले. ज्योती मिश्रा सध्या दिल्लीमध्ये एका निमसरकारी फर्ममध्ये काम करत आहे.