बनावट सोने गहाण ठेऊन घेतले दहा लाखांचे कर्ज; बँकेच्या कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

0
90

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) वाकड, – बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये बनावट सोने तारण ठेऊन त्याबदल्यात दहा लाख 42 हजार रुपयांचे कर्ज घेतले. यासाठी बँकेच्या सोने तपासणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मदत केली. त्यामुळे याप्रकरणी बँकेच्या कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 मार्च 2023 ते 15 मार्च 2024 या कालावधीत बँकेच्या काळेवाडी शाखेत घडला.

सचिन काकासाहेब पिंपरकर (वय 45, रा. काळेवाडी), संजय बाळू नेळगे (वय 45, रा. रहाटणी), दिलीप महादेव धारिया (वय 69, रा. रहाटणी) आणि तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेच्या अधिकारी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन पिंपरकर हा बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या काळेवाडी शाखेमध्ये सोने तपासणीस म्हणून काम करतो. त्याने इतर आरोपींसोबत मिळून त्यांच्याकडून 35.03 तोळे वजनाचे बनावट सोन्याचे दागिने खरे सोन्याचे दागिने असल्याचे फसवून बँकेत गहाण ठेवून घेतले. त्याआधारे आरोपींना 10 लाख 42 हजार रुपयांचे कर्ज देऊन बँकेची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.