महाळुंगे, दि. ५ (पीसीबी) – हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या कामगारांना बनावट प्रमाणपत्र देत रुग्णालयाची व शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक सप्टेंबर पूर्वी महाळुंगे येथील शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे घडला.
डॉक्टर विकास रामचंद्र साबळे (वय 51, रा. चाकण) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महाळुंगे येथील शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. फिर्यादी यांच्या नावाचा बनावट रबरी शिक्का व बनावट सही वापरून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या कामगारांना बनावट प्रमाणपत्र देत फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
            
		











































