बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीवर कारवाई

0
55

चिंचवड, दि. 12 (पीसीबी) : बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने पर्दाफाश केला आहे. दोन एजंट आणि त्याच्या साथीदारांवर याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून मिळतील तेवढे पैसे घेऊन त्यांना बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र पाठवत असे. हा संपूर्ण गोरखधंदा मोबाईल फोनवरून सुरु होता.

पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेचे (एटीबी) पोलीस शहरातील लष्करी, सरकारी तसेच महत्वाच्या खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या खासगी व्यक्तींची माहिती जमा करीत आहेत. दिघी येथील टीसीएल कंपनी मध्ये काम करणाऱ्या वाहन चालक, हाऊस किपींग स्टाफ, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी करीत होते. त्यावेळी त्यातील काही कामगारांकडे बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले.

एटीबीने त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन एजंटना १२०० ते १६०० रुपये देऊन हे प्रमाणपत्र घेतल्याचे आढळले. एकूण ४१ पोलीस पडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. हे प्रमाणपत्र बनावट असल्याची कल्पना देखील संबंधित कामगारांना नव्हती. सहकारी मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपन्यांमधील कामगार आरोपींच्या मोबाईलवर संपर्क करत. त्यांना आवश्यक कागदपत्रे मोबाईल वर पाठवली जात. त्यानंतर १५ दिवसात संबंधित कामगाराच्या मोबाईलवर पोलीस पडताळणी प्रमाणपत्र येत असे.

याबाबत एजंट संदीप बनसोडे (रा. येरवडा, पुणे), सुनील रोकडे (रा. पिंपळे गुरव) आणि त्यांना मदत करणाऱ्या इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सन २०२१ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा गोरखधंदा केला आहे.

आपल्या आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांचे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र खरे आहे का, याची खातरजमा संबंधित आस्थापना चालकांनी जवळचे पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त कार्यालय अथवा दशतवाद विरोधी शाखेतून करून घ्यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राऊत, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस अंमलदार पुंडलिक पाटील, अरुण कुटे, सुरज मोरगावकर, तुषार कदम यांनी केली.