बनावट हॉलमार्क असलेले दागिने आणि त्याची बनावट पावती देऊन एका ज्वेलर्सची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 28 जानेवारी 2023 रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भांबोली येथील अवंती ज्वेलर्स या दुकानात घडली.
ज्ञानेश्वर भाऊ लोंढे (वय 46, रा. पाईट, ता. खेड) यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत बंडू गदळे (वय 18, रा. केसनंद, पुणे. मूळ रा. बीड), नितीन बालाजी काळे (वय 24, रा. केसनंद, पुणे. मूळ रा. उस्मानाबाद) आणि इतर जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन सोन्याची पॉलिश केलेले 42.240 ग्रॅम वजनाचे दागिने त्यावर बनावट हॉलमार्क लावलेले आणि बनावट पावती असलेले फिर्यादी यांना दिले. बनावट दागिने आणि पावतीच्या आधारे फिर्यादी यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. दरम्यान हे दागिने पॉलिश केलेले असून ते बनावट असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अभिजीत आणि नितीन या दोघांना अटक केली आहे. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.