कोंढवा , दि. १ (पीसीबी) :
दहशतवादविरोधी पथकाने ‘डीओटी’च्या अधिकाऱ्यांसोबत कोंढवा भागात केलेल्या कारवाईत बेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या ‘बनावट टेलिफोन एक्स्चेंज’ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी याबाबतचे आदेश दिले. या कारवाईत एटीएसच्या पथकाने तब्बल ३ हजार ७८८ सीमकार्डसह संत सीम बॉक्स, वायफाय आणि सीमबॉक्स चालवण्याकरिता लागणाऱ्या अँटिना तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला होता.
नौशाद अहमद सिद्धीकी (वय ३२, रा. कोंढवा) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर कलम ३१८ (४), भारतीय न्याय संहिता सह भारतीय टेलिग्राफ कायदा, द टेलिकम्युनिकेशन अॅक्ट तसेच इंडियन वायरलेस टेलिग्राफी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा वापर केला जात होता. त्याकरिता या सीमकार्डचा वापर केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.
कोंढवा येथील मीठानगरमध्ये असलेल्या ‘एमए कॉम्प्लेक्स’ परिसरात हे बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटर चालवले जात होते. बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालवून त्याने दूरसंचार विभाग आणि भारत सरकार आणि मोबाईल कंपन्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने हे सीमकार्ड कुठून आणले? त्याला कोणत्या वितरकाने हे सीमकार्ड पुरवले? भारतीय यंत्रणांना विदेशातून येणारे कॉल समजू नयेत याकरिता वापरली जाणारी यंत्रणा त्याने कशी उभी केली? त्याने याचे प्रशिक्षण कुठे घेतले? त्याला या कामासाठी कोणी कोणी आर्थिक मदत केली? कोंढवा येथे जागा कोणी व कशी दिली? ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत कसून तपास करण्यात आला होता.
आरोपी नौशाद याच्यावर तपास यंत्रणांची आधीपासून नजर होती. तो काही महिन्यांपूर्वी राजस्थानला गेला होता. त्याला ठाणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्याचा ताबा एटीएसने घेतला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. ॲड. ठोंबरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला.











































