देहूरोड, दि. 16 (पीसीबी) : प्रतिष्ठित कंपनीच्या नावाने बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 15) दुपारी एक वाजताच्या सुमारास देहूरोड येथील डायमंड वॉच नावाच्या दुकानामध्ये करण्यात आली.
गौरव शामनारायण तिवारी (वय 38, रा. नवी दिल्ली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुकानदार विनोद लीलाचंद जैन (वय 58, रा. देहूरोड), दुकानातील कामगार काशिनाथ उर्फ बापू प्रभाकर चव्हाण (वय 26, रा. देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव तिवारी हे फास्टट्रॅक कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेले घड्याळाचे लोगो लावून देहूरोड येथे बनावट घड्याळांची विक्री होत असल्याची माहिती तिवारी यांना मिळाली. त्यानुसार तिवारी यांनी देहूरोड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी रविवारी कारवाई करत चार लाख 2 हजार 200 रुपये किमतीचे फास्टट्रॅक कंपनीची बनावट 400 घड्याळे आणि इतर बनावट वस्तू जप्त केल्या आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.