पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेतून नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती झालेले शेखर सिंह यांनी सोमवारी (दि.१३) सकाळी चापेकर स्मारक येथे अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सिंह यांची बदली झाली असतानाही त्यांचा महापालिकेतच जीव अडकल्याचे दिसून येत आहे. तसेच गुरुवारी (दि.९) पदोन्नती समितीची बैठक घेतल्याची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली. ८ ऑक्टोबर रोजी सिंह यांनी महापालिका मुख्यालयात दिवसभर, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. ९ ऑ क्टोबरला ते महापालिकेत फिरकले नाहीत. त्याच दिवशी महापालिका अधिकाऱ्यांनी पदोन्नती समितीची बैठक घेतली. या बैठकीला सिंह हजर नव्हते. मात्र, पदोन्नती समितीच्या निर्णयावर सिंह यांनी मोहोर उमटविल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिका आयुक्तपदाची
अतिरिक्त जबाबदारी असलेले श्रवण हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.१०) महापालिकेत येऊन आढावा घेतला. विभागप्रमुखांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या. नाशिक कुंभमेळा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेले मावळते आयुक्त सिंह यांनी रविवारी (दि.१२) राजकीय पक्षधार्जिण्या विविध सामाजिक संघटनांकडून नागरी सत्कार स्वीकारला. त्यानंतर सोमवारी (दि.१३ सकाळी महापालिका अधिकाऱ्यांना घेऊन शेखर सिंह यांनी चापेकर स्मारकामध्ये बैठक घेतली. बदली झाल्यानंतरही सिंह यांनी बैठक घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. पदोन्नती समितीची सभा आणि बैठक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, पदोन्नती समितीच्या बैठकीला प्रशासनाचे सहआयुक्त मनोज लोणकर उपस्थित होते. या बैठकीत कोणाकोणाला पदोन्नती देण्यात आली, याची माहिती त्यांना विचारली असता लोणकर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे लोणकर यांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
सिंह यांनी मंजूर केलेल्या भांडवली कामांची यादी द्या
शेखर सिंह यांची बदली होण्यापूर्वी एक महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी मंजूर केलेल्या विविध विभागाच्या भांडवली कामांची यादी, मंजूर झालेल्या सर्व निविदांची माहिती, अंदाजपत्रक रक्कम, मंजूर कंत्राटदाराचे नाव, निविदा क्रमांक, मंजुरी दिनांक, विभागाचे नाव, १ सप्टेंबर ते ५ आक्टोबरपर्यंत दिलेल्या टीडीआरच्या फाईलचा तपशील द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी निवेदनाव्दारे महापालिकेच्या लेखा विभागाकडे केली आहे.