बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस अलर्ट मोडवर;

0
82

शाळांमध्ये सीसीटिव्ही बसवण्यास कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून घेण्याच्या सूचना

चिंचवड, दि. २३ (प्रतिनिधी)

बदलापूर येथे दोन मुलींवर शाळेतील एका कर्मचाऱ्याने अत्याचार केले. या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळांमध्ये जाऊन तसेच पोलीस ठाण्यात बैठका घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून घेण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत.


बदलापूर घटनेवरून राज्यभरात उमटलेल्या तीव्र पडसादानंतर राज्य शासनाने एक शासन निर्णय जारी केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी करावयाच्या उपायोजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पुढील महिनाभरात प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, सीसीटीव्ही फुटेज आठवड्यातून किमान तीन वेळा तपासावे, त्यासाठी नियंत्रण कक्ष असावा. अनुचित प्रकार आढळून आल्यास पोलिसांना तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी. यासह शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.


या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसोबत बैठका घेऊन शासन आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. तसेच, शाळेत कंत्राटी पद्धतीने असलेल्या कामगारांची चारित्र्य पडताळणी तत्काळ करून घेण्यास सांगितले. याव्यतिरिक्त ठाणे स्तरावर शांतता व मोहल्ला कमिटीच्या सदस्यांना बोलवून हद्दीमध्ये शांतता कायम राखण्यासाठी खबरदारी घेण्यास सूचित केले आहे.


पोलिसांनी शाळेतील शिक्षकांना मुलांच्या सुरक्षितेबाबत सूचना केल्या. यावेळी शिक्षकांनी देखील शाळेबाहेर घिरट्या घालणाऱ्या टवाळखोरांच्या तक्रारी केल्या. तसेच, शाळा सुटताना आणि भरताना पोलिसांची नियमीत गस्त व्हावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 33 दामिनी पथके सक्रिय आहेत. रस्त्याने चालणाऱ्या महिलांसोबत शाळा, कॉलेजच्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी दामिनी पथकावर आहे. त्यानुसार, दामिनी पथके शाळांना नियमित भेटी देत असतात. शाळेत असलेल्या तक्रार पेट्या उघडून विद्यार्थिनींच्या समस्येचे निराकरण देखील केले जाते. यापूर्वी अनेक विद्यार्थिनींच्या तक्रारींचे दामिनी पथकाने समाधान केल्याची नोंद आहे. दरम्यान, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर दामिनी पथकांना अधिक अलर्ट राहण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून करण्यात आल्या आहेत.