बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक

0
41

मुंबई, दि. २१ : बदलापूर घटनेत सरकारकडून कारवाईत दिरंगाई होत आहे तसेच याप्रकरणावर सरकारकडून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी असल्याचे सांगत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही राजकारण करत नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठकी संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा प्रश्नावर दीर्घ चर्चा झाली. गेल्या १० वर्षात महिला असुरक्षिततेचे वाढते प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावर सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली.

सरकारकडून कारवाई करण्याबाबत दिरंगाई
बदलापूर घटनेटत शाळा आणि इतर प्रशासनाने दिरंगाई केली असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. तसेच सरकारकडूनही कारवाई करण्याबाबत दिरंगाई झाली. त्यातही बदलापूर आंदोलनावर सत्तापक्षातून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी आहेत. सरकारने संवेदनशीलपणे हा मुद्दा हाताळावा, असे नाना पटोले आणि जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्य सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी
तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांवर आणि महायुती सरकारच्या कारभारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या २४ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये महाविकास आघाडीमधील आम्ही तिन्ही पक्ष सामिल होऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले.