बदनामी करण्याची भीती दाखवत प्रियकराने उकळले साडेसहा लाख रुपये

0
393

चिखली, दि. २५ (पीसीबी) – तुझ्यामुळे माझ्या हातून मित्राचा खून झाला असून ते प्रकरण मिटविण्यासाठी पैसे आणि सोन्याचे दागिने मागत प्रियकराने तरुणी कडून एकूण सहा लाख 40 हजार रुपयांचा ऐवज घेतला. या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत चिखली प्राधिकरण येथे घडला.

शहानवाज शिराजुद्दीन अन्सारी (वय 20, रा. नवी मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 44 वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांच्या मुली सोबत इंस्टाग्राम वरून मैत्री केली. तिचा फोटो त्याने इंस्टाग्रामला डीपीवर ठेवला. डीपी वरील फोटो बाबत आरोपी अन्सारी याच्या मित्राने अपशब्द वापरल्याने त्याच्या हातून मित्राचा खून झाला आहे, अशी खोटी बतावणी करून ते प्रकरण मिटवण्यासाठी पैसे व सोन्याचे दागिने दे अन्यथा पोलीस तुमच्या घरी येऊन तुझ्याकडे चौकशी करतील. त्यामुळे तुमची बदनामी होईल, असे अन्सारी याने सांगितले. तसेच पैसे दिले नाहीत तर तुला व तुझ्या घरच्यांना संपवून टाकेन, अशी भीती दाखवून अन्सारी याने फिर्यादी यांच्या मुलीकडून एक लाख रुपये रोख रक्कम आणि 90 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला असल्याचे फिर्यादित नमूद आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.