“बटन कसं दाबायचं ते मी सांगणार नाही”

0
166

दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, पेट्रोलचे भाव ५० दिवसांत खाली आणतो. ५० दिवसांत दर खाली आले नाहीत पण भाव दीडपट वाढले. यांनी पेट्रोल, डिझेल महाग केले आणि साखर, दूध स्वस्त केलं. तुम्ही जे पिकवता ते स्वस्त केलं आणि दुसरे पिकवतात त्यासाठी तुमच्या खिशातून पैसे काढले काढले. सांगताना सांगतात की सगळ्यांच्या खिशात काही हजार रुपये टाकले. मात्र पैसे घालायचे एका खिशात आणि खालच्या खिशातून काढून घ्यायचे आणि तेही डबल काढून घ्यायचे, आता ही पाकीटमारी बंद करायची की नाही? आणि पाकीटमारी बंद करायची असेल तर हा पाकीटमार कोण? याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला करावे लागेल, असा घणाघाती हल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढवला.

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. येथील मारुती मंदिरात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मेळाव्यात ईव्हीएम मशीनमध्ये कचाकचा बटन दाबा. आपल्या भागाला निधी कमी पडू देणार नाही, असे वक्तव्य केले होते. हाच धागा पकडत शरद पवार म्हणाले की, “आपल्याला वाद वाढवायचे नाहीत. संघर्ष वाढवायचा नाही. आपल्याला मनापासून काम करायचे आहे आणि हे काम करत असताना तुतारीचे बटन दाबा. काल कुणीतरी सांगितले की, बटन कसं दाबायचं. ते मी सांगणार नाही” पवारांच्या या क्तव्यानंतर एकच हशा पिकला.