आंतरराष्ट्रीय निकषांनुसार शहर सज्ज; वाहतूक, सुरक्षा व सौंदर्यीकरणाचे सूक्ष्म नियोजन
दि.२२(पीसीबी) -‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक टप्पा उद्या, शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या (UCI) निकषांनुसार व्यापक व काटेकोर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
स्पर्धेतील प्रमुख टप्पा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथून दुपारी १.३० वाजता सुरू होणार असून पुणे शहरातील विविध मार्गांवरून जात हा टप्पा जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. या अंतिम टप्प्याचे एकूण अंतर ९९.१५ किलोमीटर आहे.
ही स्पर्धा राजीव गांधी ब्रिज (औंध), काळेवाडी फाटा, बास्केट ब्रिज (रावेत), डी. वाय. पाटील कॉलेज (आकुर्डी), भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक, इंद्रायणी नगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, स्पाईन रोड, जुना आरटीओ रोड, आयुक्त बंगला, एम्पायर इस्टेट ब्रिज अशा महत्त्वाच्या मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भाग एकाच आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय निकषांनुसार शहराची तयारी
स्पर्धेच्या अनुषंगाने महापालिकेमार्फत रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथ दुरुस्ती, गतिरोधक हटविणे, चेंबर्स समपातळीवर आणणे, बीआरटी रेलिंगची दुरुस्ती व रंगरंगोटी, पुलांचे सुशोभीकरण, थर्मोप्लास्टिक पेंटिंग, चौकांचे सौंदर्यीकरण, विद्युत व्यवस्था सुधारणा तसेच संपूर्ण मार्गाची विशेष साफसफाई करण्यात आली आहे.
यासोबतच मार्गावरील बेवारस वाहने हटविणे, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची आखणी, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय व आपत्कालीन सेवा यांचेही सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. काही कालावधीसाठी आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भित्तिचित्रांतून क्रीडा आणि संस्कृतीचा संगम
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी क्रीडा, सायकलिंग, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि विविध खेळांतील दिग्गजांचे दर्शन घडवणारी आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या सौंदर्यीकरण उपक्रमामुळे शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अंतिम टप्प्यात देश-विदेशातील नामवंत सायकलपटूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.






































