बजाज कंपनीला पाठवले खोटे समन्स

0
446

निगडी, दि. २४ (पीसीबी) – निगडी येथील बजाज ऑटो कंपनीला औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाच्या नावाने खोटे समन्स पाठवले. हा प्रकार 22 ते 29 ऑगस्ट या कालावधीत निगडी येथील बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीत घडला.

बजाज ऑटो लिमिटेडचे लीगल मॅनेजर उमेश वासुदेव भंगाळे (वय 36, रा. मोशी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 23) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रभाकर विठ्ठलराव मानकर (रा. औरंगाबाद) आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज ऑटो लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, लीगल मॅनेजर, प्रेसिडेंट पर्चेस डिपार्टमेंट, प्रेसिडेंट अकाउंट फायनान्स डिपार्टमेंट यांच्या नावाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी), औरंगाबाद यांच्याकडून समन्स प्राप्त झाले. त्यात 6 सप्टेंबर रोजी जेएमएफसी औरंगाबाद या न्यायालयासमोर हजर राहण्याच्या सूचना होत्या. त्यावर कोर्टाचा सील, शिक्का, त्यावर सहायक अधीक्षक मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, औरंगाबाद यांची सही होती.

आलेल्या समन्सचा तपशील तपासण्यासाठी फिर्यादी यांनी न्यायालयाच्या संकेतस्थळावर चौकशी केली. तसेच न्यायालयाकडे पत्रव्यवहार करून खात्री केली असता असे कोणतेही समन्स बजाज ऑटोला पाठविण्यात आले नसल्याचे समोर आले. आरोपींनी खोटी सही, खोटा बारकोडचा वापर करून खोटे समन्स पाठवले. त्यात आरोपीने हस्ताक्षरात धमकीचा मजकूर लिहून कंपनी व पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळण्याच्या हेतूने धमकी दिली तसेच कंपनीची बदनामी केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.