बेळगाव, दि. ४ (पीसीबी) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कर्नाटकमध्ये सत्ता आल्यास बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू असं आश्वासन काँग्रेसने या जाहीरनाद्वारे दिलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर भाजपा आणि हिंदुत्त्ववादी संघटनांकडून टीका करण्यात येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते बेळगावातील प्रचार सभेत बोलत होते.
“काँग्रेसचे नेते आता मुख्यमंत्री झाल्यासारखे वागायला लागले आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपण मुख्यमंत्री आहोत. काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध समाजाचा अपमान केला जातो. आता तर यांची मजल इथपर्यंत पोहोचली की ते आता बजरंग दलावर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. मात्र, बजरंग दलावर बंदी घालायची कोणाच्या बापाची हिंमत नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची हिंमत केली होती. मात्र, त्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं. मुळात काँग्रेस कर्नाटकमध्ये सत्तेस येणार नाही. मात्र, या निर्णयातून काँग्रेसचा उद्देश दिसून येतो. असे निर्णय घेऊन काँग्रेस नेमकं कुणाचं लांगुलचालन करत आहेत?” असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. तसेच काँग्रेसल हिंदुत्त्वाचा द्वेष आहे, असेही ते म्हणाले.