‘बकुळगंध’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

0
203

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – ज्येष्ठ कवयित्री शान्ताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून लेखक, कवी राजन लाखे यांची निर्मिती असलेल्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची  इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् या प्रतिष्ठित ग्रंथामध्ये नोंद घेण्यात आली आहे.

शान्ताबाई शेळके यांच्या आठवणी आणि कविता यांवर महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील १०० मान्यवरांच्या १०० आठवणी, १०० कवितेवर भाष्य तसेच १०० कवितांची मानवंदना असलेला हा ग्रंथ साहित्य क्षेत्रात अभिनव ग्रंथ ठरला आहे. 

साहित्य क्षेत्रातील अभिनववाग्विलासिनी कवयित्री शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दी (१९२२ – २०२२) वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने शान्ता शेळके यांच्याशी परिचित असलेले, त्यांचेशी संबंधित असलेले महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील साहित्य, नाट्य, सांस्कृतिक, गायन, अभिनय, शैक्षणिक, राजकीय, निवेदन, संगीत, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील १०० दिग्गज मान्यवरांनी निवडलेल्या शान्ता शेळके यांच्या १०० कविता त्यांना मानवंदना म्हणून अर्पण केल्या. याचे चित्रिकरण करून जन्मशताब्दी वर्षात, सदर आठवणी आणि कविता वर्षभर दर मंगळवारी आणि शुक्रवारी या आठवड्यातील दोन दिवस यू ट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील तमाम मराठी रसिकांपर्यंत पोहचवण्यात आल्या.

या सर्व मान्यवरांच्या बोलक्या भावनांचे शब्दांकन करून ग्रंथरूपात साकार झालेली साहित्यकृती म्हणजे ‘बकुळगंध’ ग्रंथ होय. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आणि डॉ. डी वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या सहकार्याने ही साहित्यकृती प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.   

ग्रंथरूपात साकार झालेली अशा प्रकारची साहित्यकृती,  साहित्य क्षेत्राच्या इतिहासात आजपर्यंत झालेली नसल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् कडून ‘बकुळगंध’ची नोंद घेण्यात आली.

‘बकुळगंध’वर आतापर्यंत  पुणे, कल्याण, डोंबिवली, सोलापूर व इतर ठिकाणी समीक्षात्मक चर्चा झाल्या असून नुकतीच या ग्रंथाची तिसरी आवृती प्रसिद्ध झाली आहे.