दि. २६ ( पीसीबी ) – एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने पुणे हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे दिवसा गजबजलेल्या स्वारगेट एसटी स्टँड परिसरात हा लाजिरवाणा प्रकार घडल्याची माहिती आहे. पीडित तरुणीला अनोळखी आरोपीने एसटी बस अन्यत्र थांबल्याचं खोटं सांगितलं, त्यानंतर तिला बंद बसमध्ये नेऊन तिच्यासोबत बळजबरी केल्याचा आरोप आहे. पहाटे साडेवाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. संबंधित २६ वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती. यावेळी एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, मी तिकडे जाणार नाही, असं त्या मुलीने त्या इसमाला सांगितलंही, मात्र मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवलं. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेली, आणि तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. पण, तू टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला, अशी माहिती आहे. घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकं आरोपीचा शोध घेत आहेत.