बंडखोर ४० पैकी ३७ आमदार पुन्हा निवडूण येण्याची सूतराम शक्यता नाही

0
380

– खासगी सर्वेक्षणातील अंदाज, बंडखोर आमदारांमध्ये अस्वस्थता

पुणे, दि. २१ (पीसीबी)  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी किती आमदार पुन्हा निवडून येणार, याबाबत महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहेत. शिंदे यांनी तर एकही आमदार पडू देणार नाही, असा निर्धार केला आहे. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी बंडखोर आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असं भाकित केलं आहे.ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनीही याबाबतचे ट्विट केले आहे. मित्राने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला नरके यांनी दिला आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी बहुतेक आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असं या सर्वेक्षण आढळून आल्याचे नरके यांनी म्हटलं आहे.

‘माझे एक निवडणूक सर्व्हे करणारे मित्र आहेत.त्यांचे अभ्यास 95% पर्यंत अचूक असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झालेले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी शिंदे सेनेच्या 40 आमदारांच्या मतदारसंघात नमुना सर्व्हे केले असता 40 पैकी 37 आमदार पराभूत होतील. म्हणजे मुख्यमंत्री शिंदेसाहेब राजकारण सोडणार तर,’ असं ट्विट नरके यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या 50 पैकी एक आमदार पडला तरी राजकारण सोडून गावाकडे शेती करायला जाणार असल्याची घोषणा केली आहे. उलट भाजपसोबत 200 आमदार निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता नेमका कुणाचा दावा खरा ठरणार, याचं उत्तर निवडणुकीतच मिळेल.