बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपरीत लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडला

0
259

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – शिवसेनेत बंडखोरी केलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोरवाडी चौकात लागलेला फलक शिवसैनिकांनी फाडला. फलकवरील शिंदे यांच्या फोटोला जोडे मारले. शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, अशा जोरदार घोषणा दिल्या.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना समर्थन दिलेल्या अपक्ष अशा 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे दोघांच्याही समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत.

संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वातील सोमवारी झालेल्या बैठकीत सर्वांनी ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक, #we support eknath shinde असा मजकूर लिहिलेला फलक मोरवाडी चौकात झळकला. त्यामुळे खळबळ उडाली. हा फलक लागल्याचे कळताच शिवसैनिक एकत्र आले. त्यांनी हा फलक फाडून टाकला. दरम्यान, हा फलक नेमका कोणी लावला होता, हे पुढे आले नाही. चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, रोमी संधू, गणेश अहिर, तुषार नवले, गोरख पाटील, प्रदीप दळवी आदी उपस्थित होते.