“बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न

0
254

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – माजी मंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आपण याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोटो दाखवत माहिती दिल्याचा दावा कदमांनी केला. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली आणि आता स्वतःची कृती योग्य आहे असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे,” असं मत महेश तपासे यांनी व्यक्त केलं.

महेश तपासे म्हणाले, “शिवसेनेच्या सर्व बंडखोर नेत्यांनीच शिवसेना फोडली आहे. त्यांनी मातोश्रीसोबत दगाफटका केली. ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि याचं खापर जाणून बुजून राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडण्याचा केविलवाणा प्रकार केला जात आहे. संपूर्ण देशाला माहिती आहे की २०१९ च्या निवडणुकीनंतर स्वतः शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांची मोट बांधली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनाही यात सामील करून घेतलं.”

“महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी चांगला कारभार केला. त्यामुळेच देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव आलं. आज शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंना सोडून जात असतानाही राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेला अधिकृत शिवसेना मानते. आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरेंसोबत आहोत,” असं महेश तपासे यांनी सांगितलं.

“शिंदे गटाने शिवसेना फोडली, परंतु त्यामागील खरे सूत्रधार भाजपा आहे. भाजपाच्या मनात २०१९ ला सत्तेबाहेर राहावं लागल्याचा राग आहे. त्या रागातूनच भाजपाने शिवसेना पक्ष फोडला. यासाठी पोलिसी बळाचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात आला. मात्र, महाराष्ट्रातील शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहात आहे. ज्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं, आज तेच लोक मातोश्रीचे गद्दार झाले आहेत,” असा आरोप तपासे यांनी बंडखोर गटावर केला.