बंडखोर उमेदवारांनीच केला हिमाचल मधील भाजपचा टांगा पलटी

0
311

– संधी नाकारलेल्या १४ आमदारांनीच घालवली भाजपची सत्ता. जे.पी. नढ्ढा यांच्यावर फुटले खापर

शिमला, दि. ९ (पीसीबी) : हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा बंडखोरांनीच तेथील सत्ताधारी पक्षाचा टांगा पलटी केल्याचे मतमोजणीतून पुढे आले आहे. भाजपने तब्बल ११ आमदारांची तिकिटे कापली होती, त्यामुळे भाजपच्या २१ नेत्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली होती, त्यातील १४ जणांनी भाजप उमेदवारांचा पराभव करत सत्ता घालविण्यास हातभार लावला आहे. हिमाचलमधील बंडखोरी मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले हेाते. मात्र, त्यानंतरही बंडखोरी कायम राहिली आणि भाजपची हिमाचलमधील सत्ता गेली.

फतेहपूरमध्ये माजी खासदार किरपाल परमार यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याची चर्चा होती. त्याचा एक कथित व्हिडिओही व्हायरल झाला होता. अनेक मतदारसंघामध्ये भाजपने बंडखोरांना हलक्यात घेतले, त्यामुळेच जयराम ठाकूर सरकारचे आठ मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मात्र, भाजपविरोधात बंडखोरी करूनही भाजपच्या बंडखोरांनी नालागढ, देहरा आणि हमीरपूरमध्ये हे तीन मतदारसंघ जिंकले आहेत. काँग्रेसच्या बंडखोरांनीही पक्षाचे काही जागांवर नुकसान केले आहे.

अनीमध्ये काँग्रेसमधून बंडखोरी करत परस राम यांनी निवडणूक लढवली होती. येथून भाजपचे उमेदवार लोकेंद्र कुमार विजयी झाले. मात्र, विद्यमान आमदार किशोरी लाल यांनीही येथून बंडखोर म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, येथे लढत लोकेंद्र कुमार आणि परसराम यांच्यात होती. देहरामध्ये विद्यमान आमदार होशियार सिंह यांनी भाजपमधून बंडखोरी करून निवडणूक लढवली आणि येथून भाजप आमदार रमेश ढवला यांचा पराभव झाला. होशियार सिंग यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली.

नालागढचे माजी आमदार केएल ठाकूर यांनी भाजपविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवली. येथे केएल ठाकूर यांनी काँग्रेसचे उमेदवार हरदीप बावा यांना कडवी झुंज देत निवडणूक जिंकली. भाजपचे उमेदवार लखविंदर राणा येथे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. इंदोरा येथील माजी आमदार मनोहर धीमान यांनी भाजपविरोधात बंड केले, तर येथील काँग्रेसचे उमेदवार मलेंद्र राजन यांनी भाजपच्या विद्यमान आमदार रिता धीमान यांचा पराभव केला. किन्नौरचे भाजपचे माजी आमदार तेजवंत नेगी यांनी तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, तर येथेही काँग्रेसचे आमदार जगतसिंग नेगी यांनी भाजप उमेदवार सूरत नेगी यांचा पराभव केला.

फतेहपूरमध्ये माजी खासदार कृपाल परमार यांनी मंत्री राकेश पठानिया यांच्या विरोधात बंड केले आणि येथेही विद्यमान आमदार भवानी पठानिया पुन्हा विजयी झाल्या. कुल्लूचे माजी उमेदवार राम सिंह यांनी भाजपचे उमेदवार नरोत्तम सिंह यांच्याविरोधात बंडखोरी करत येथे अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. येथे माजी खासदार महेश्वर सिंह यांचे तिकीट कापण्यात आले. मात्र, महेश्वर सिंह यांना बसवण्यात आले, मात्र येथेही भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुंदरसिंह ठाकूर पुन्हा आमदार झाले. हमीरपूरमध्ये बंडखोर आशिष शर्मा यांनी भाजपचे उमेदवार आमदार नरेंद्र ठाकूर यांचा पराभव केला.

धर्मशालामधून विपिन नैहरिया, अनिल चौधरी, मनालीमधून महेंद्र ठाकूर, बारसरमधून संजीव शर्मा, भोरंजमधून पवन कुमार, रोहरूमधून राजेंद्र धिरता आणि चंबामधून इंदिरा कपूर यांनी भाजपविरोधात बंड केले आणि भाजपचे उमेदवार येथे पराभूत झाले. दुसरीकडे माजी आमदार जगजीवन पाल यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे राहिले, तर येथे भाजपला त्याचा फायदा झाला आणि विधानसभा अध्यक्ष विपीनसिंग परमार यांनी बाजी मारली.

आदित्यनाथ, नड्डांनी सभा घेतलेल्या मतदारसंघात भाजप काठावर पास
त्याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घुमरविनमध्ये गर्ग यांचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार केला. जेपी नड्डा स्वत: निवडणूक प्रचारादरम्यान तब्बल 9 दिवस जिल्ह्यात थांबले होते. प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी निवडणूक रॅली काढल्या. मात्र असे असतानाही नयना देवी जी सदरमध्ये अत्यंत कमी मताधिक्याने जिंकण्यात भाजप नेत्यांना समाधान मानावे लागले.