– मूळचे शिवसैनिक आजही ठाकरे यांच्या बरोबर कायम आहेत
मुंबई, दि. १२ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना पवार यांनी भाजपवरती निशाणा साधला आहे. भाजप सर्व यंत्रणांचा वापर करून राजकीय दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असून सर्व देशातील सत्ता केंद्रित करण्याचं प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मूळची शिवसेना आणि शिवसैनिक कायम आहेत, बंड केलेले आमदार पुन्हा निवडूण येण्याची शक्यता नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. भाजप अशी सत्ता एकवटून, नागपुरातून दिली जाणारी विचारधारा पसरविण्याचे काम करत आहे. मात्र, सर्व सामान्य जनता हुशार आहे. अशी केंद्रित केलेली सत्ता फार काळ टिकत नाही असंही पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून, सुसंवाद ठेऊन लोकांचे प्रश्न सोडवा, असं आवाहन पक्षातील नेत्यांना केलं. ते म्हणाले, ‘५५ वर्षाच्या कारकिर्दीत ३० वर्ष विरोधात होतो, २५ वर्ष सत्तेत होतो. त्यात विरोधी पक्षात असताना ३० वर्षात पक्ष वाढीला चालना मिळाली. आता आपण विरोधी पक्षात आहोत.
लोकांचे प्रश्न समजून घ्या, औरंगाबादमध्ये होतो तेंव्हा तिथले चित्र बघितलं. मूळ शिवसेना विचलित झालेली नाही शिवसैनिक अजूनही जागेवर आहेत, शिंदे गटाकडे गेलेले आमदार निवडून येणार नाहीत. असं चित्र औरंगाबादमध्ये दिसल्याचंही पवार म्हणाले. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
दरम्यान, महाराष्ट्राक सत्ता गेली तरी फरक पडत नाही. निवडणुकांसाठी आमचे कार्यकर्ते तयार आहेत. पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, विरोधीपक्ष म्हणून आम्ही आग्रही भुमिका घेणार आहोत. महाविकास आघाडी भाजपला दुर ठेवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या एकत्र लढणार असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आमदार जरी विभागले गेले असले तरी कार्यकर्ते तळागळातील शिवसैनिक ठाकरेंसोबत असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलं आहे.











































